News Flash

हनुमान जयंती उत्साहात

महापूजा, लघुरुद्र, महाभिषेक, महाप्रसाद अशा धार्मिक कार्यक्रमांसोबत व्याख्यानमाला, भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गुरुवारी हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हनुमानाचे जन्मस्थळ

| April 26, 2013 02:54 am

महापूजा, लघुरुद्र, महाभिषेक, महाप्रसाद अशा धार्मिक कार्यक्रमांसोबत व्याख्यानमाला, भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गुरुवारी हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजनेरी डोंगरावरील मंदिर परिसरात भाविकांची भल्या सकाळपासूनच गर्दी झाली होती, तर ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरातही भक्तजनांची रीघ लागली होती.
हनुमान जयंतीनिमित्त बहुतांश मंदिरे आकर्षक रोषणाईने सजविण्यात आली. श्रीक्षेत्र अंजनेरी येथे यानिमित्त खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अंजनेरी येथील हनुमान मंदिर डोंगरावर असल्याने अनेक भाविकांनी भल्या सकाळी दर्शनासाठी कूच करण्यास प्राधान्य दिले. दुपारी उन्हाचा तडाखा बसत असला तरी हनुमानभक्तांचा उत्साह ओसरला नव्हता. यानिमित्त हनुमान मूर्तीची विधिवत पूजा व हनुमान याग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टाकळी येथील हनुमान मंदिरात विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हनुमान जन्मसोहळा, लघुरुद्र, भजन सेवा आदींचा समावेश होता. सामुदायिक सूर्यनमस्कार या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. नाशिक शहरातील शालीमार येथील पटेल हनुमान मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले. मायको सर्कल येथे दर्शनासाठी भाविकांची प्रचंड झुंबड उडाली होती. गर्दीमुळे वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून मंदिर व्यवस्थापनाने खास सोय केली. चाणक्यनगर येथे संकटमोचन हनुमान व सिद्धेश्वर गणपती सेवा मंडळातर्फे हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला. खुटवडनगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर, कानडे मारुती लेन मित्रमंडळ, येवलेकर मळ्यातील हनुमान मंदिर, पंचवटीच्या हनुमान मित्रमंडळ व बळिराजा फ्रेंड्स सर्कलतर्फे हनुमान जयंतीनिमित्त हनुमान जन्मोत्सव, सामूहिक हनुमान चालिसा पठण, महाप्रसाद वाटप, दूध वाटप, भक्तिसंगीत असे विविध कार्यक्रम झाले. गंगापूर रोडवरील नसती उठाठेव मित्र मंडळाच्या वतीने यानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालयाच्या आवारातील जुने मारुती मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अशोकनगर येथील सिद्ध हनुमान मंदिर सेवा समितीतर्फे काल्याचे कीर्तन तसेच श्रमिकनगर येथील श्री महारुद्र हनुमान मंदिरात संगीत गाथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वच हनुमान मंदिरांमध्ये दिवसभर दर्शनासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसत होते.
नाशिकप्रमाणे धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातही हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. हनुमान जयंतीनिमित्त हनुमान मंदिरात शोभायात्रा, महाआरती, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव शहरातील दाणाबाजार परिसरातील घाणेकर चौक व गोलाणी मार्केट परिसरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर, शाहू नगरमधील तपस्वी हनुमान मंदिर तसेच इतर ठिकाणीही पहाटेपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातही हनुमान मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्याचे पाहावयास मिळाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 2:54 am

Web Title: celebration of hanuman jayanti
Next Stories
1 नाशिकच्या अ‍ॅथलेटिक्समधील ‘त्रिमूर्ती’
2 व्यसनमुक्तीसाठी तंटामुक्त गाव समित्यांकडून जनजागृती
3 सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्यटन स्थळांचे ‘मार्केटिंग’
Just Now!
X