महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून त्यांच्या म्हैस या गाजलेल्या कथेवर प्रभाकर फिल्म्सने बनविलेल्या ‘चांदी’ चित्रपटाचा फर्स्ट लूक जाहीर करण्यात आला. समीर नाईक-ज्ञानेश्वर गोवेकर दिग्दर्शित या चित्रपटाच्या संगीताच्या सीडीचे प्रकाशन आणि संकेतस्थळाचेही उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला नाटय़संमेलनाध्यक्ष श्रीकांत मोघे, पुलंचे निकटवर्ती श्रद्धानंद ठाकूर व जयंत देशपांडे, दिग्दर्शक एन. चंद्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

म्हैस ही रसिकवाचकांमध्ये गाजलेली कथा. त्याचे चित्रपटात रूपांतर करण्यासाठी अनिल पवार यांनी लेखन केले आहे. या चित्रपटात रमेश देव, दीपक शिर्के, वैभव मांगले, संतोष पवार, भालचंद्र कदम, गणेश दिवेकर, संजीवनी जाधव, विकास समुद्रे, किशोरी अंबिये, किशोर नांदलस्कर आदींनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाला संगीतकार प्रवीण कुवर यांनी संगीत दिले आहे. ‘चांदी गो चांदी’, ‘नकली लागलंय चमकायला’, ‘उस डोंगा’ अशी गाणी यात आहेत.  ‘नकली लागलंय चमकायला’ या गाण्याची आठवण संगीतकार प्रवीण कुवर यांनी सांगितली. ते म्हणाले की, गाण्याचा मुखडा अवधूत गुप्ते गाणार होता. रेकॉर्डिगसाठी तो आजीवासन स्टुडिओमध्ये आला.  मुखडा गाऊन संपल्यानंतर पुढचे गाणी आपण स्वत:च गाणार होतो. परंतु, गाण्याचे बोल आणि चाल दोन्हीही अवधूत गुप्तेला इतके आवडली की सगळे गाणे आपणच गाऊ असे अवधूतने जाहीर केल्याची आठवण प्रवीण कुवर यांनी सांगितली.