परवानगी नसताना विद्यार्थ्यांना आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश दिला. प्रवेश फी म्हणून मोठमोठय़ा रकमाही घेतल्या, नंतर हा प्रकार उघडकीस आला. फसवणूक झालेल्या विद्यार्थी व पालकांनी कागदपत्रे व पैसे परत मिळावेत यासाठी वारंवार हेलपाटे मारले. मात्र, उपयोग न झाल्याने पालकांनी पोलिसात धाव घेतली असून सिध्दकला आयुर्वेद महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
याबाबत सुभाष लोणकर, अनिल मोरे, अशोक पाटील आदींनी पोलिसांकडे केलेल्या मागणीत म्हटले आहे की, सन २०११-१२ या वर्षांत आमच्या मुलांचे बी. ए. एम. एस. प्रथम वर्षांसाठी येथील सिध्दकला आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश घेतले होते. त्यावेळी महाविद्यालय मान्यताप्राप्त असून कोणतीही कायदेशीर प्रक्रिया सुरू नसल्याचे सांगण्यात आले होते. काही महिन्यांनंतर परिक्षेचे फॉर्म भरुन घेतले जात नाहीत म्हणून विद्यार्थ्यांना शंका आली. त्यांनी व्यवस्थापनाकडे याबाबत चौकशी केली असता महाविद्यालयास ‘आयुष’ची परवानगीच नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेले. त्यानंतर चालू वर्षीही विद्यार्थ्यांचे असे नुकसान होऊ नये यासाठी प्रवेशावेळी दिलेली मूळ कागदपत्रे देण्याची विनवणी विद्यार्थ्यांनी केली. वारंवार हेलपाटे मारल्यानंतर कागदपत्रे, दिली, मात्र फीच्या रकमा दिल्या नाहीत.
वारंवार तगादा केल्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी याबाबत विचार करू, असे आश्वासन व्यवस्थापनाने दिले होते. त्यानंतरही विद्यार्थ्यांनी मागणी केली, मात्र ती धुडकावून लावण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी व पालक संतप्त झाले. अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून आमचे पैसे परत मिळावेत, मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली असून पोलीस आता काय निर्णय घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.