शहरातील एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयातील ‘मिस् एसएमआरे’ गौरी भावे हिच्यासह उपविजेत्या नताशा साळवे व निकिता कनोजिया यांच्यापुढे आता एसएनडीटी विद्यापीठाच्या वतीने होणाऱ्या ‘मिस् तेजस्विनी’ स्पर्धेत नाशिकचा झेंडा फडकत ठेवण्याची जबाबदारी आली आहे.
संगीताच्या तालावर अक्षरश: डोलणारी रोषणाई. रॅम्पवर तितक्याच नजाकतीने वावरणाऱ्या अप्सरा. दुसरीकडे परीक्षकांच्या प्रश्नाच्या भडीमाराला तितक्याच सावधानतेने देण्यात येणारी उत्तरे, अशा उत्साहपूर्ण वातावरणात एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयाची ‘मिस् एसएमआरके’ स्पर्धा परशुराम साईखेडकर नाटय़मंदिरात झाली. विज्ञान शाखेच्या गौरी भावे हिने आपल्यातील कलागुणांसह वैचारिकतेचे प्रदर्शन करत ‘मिस् एसएमआरके’ मुकूट पटकावला. महाविद्यालयाच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कालावधीत आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा विद्यार्थिनीच्या विश्वात अनेक वर्षांपासून कुतूहलाचा विषय ठरली आहे. शहर परिसरात अशा प्रकारची स्पर्धा घेणारी एसएमआरके हे एकमेव विद्यालय असल्याने मुलींमध्ये या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अपूर्व उत्साह पहावयास मिळतो. सिने, नाटय़ वा मॉडेलिंग अशा चंदेरी दुनियेत भ्रमण करण्याची इच्छा असलेल्यांसाठी ही स्पर्धा एक माध्यम म्हणून काम करत असल्याचे विद्यार्थिनीचे मत असले तरी महाविद्यालयातील चांगले व्यक्तिमत्व सर्वांसमोर यावे, विद्यार्थिनीचा सर्वागीण विकास व्हावा, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. स्पर्धेची तयारी वार्षिक स्नेहसंमेलनाआधीपासून सुरू होते.
यंदा या स्पर्धेसाठी महाविद्यालयाकडे ५४ विद्यार्थिनींनी आपली नावे नोंदवली होती. स्पर्धेचे योग्य नियोजन व्हावे तसेच कुशल स्पर्धकच स्पर्धेत यावेत, यासाठी महाविद्यालयाच्या वतीने ‘मिस् एसएमआरके’ ही समितीही गठीत करण्यात आली होती. समितीच्या वतीने अंतिम स्पर्धेसाठी योग्य उमेदवारांची निवड व्हावी यासाठी चार फेऱ्या घेण्यात आल्या. पहिल्या फेरीत ‘स्त्री भ्रृण हत्या’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यानंतर जागतिकीकरण, पर्यावरण अशा विविध विषयांवर निबंध स्पर्धा घेण्यात आली. अशा विविध फेऱ्यांतून अंतिम स्पर्धेसाठी स्पर्धकांचे वक्तृत्व, विविध भाषांवरील त्यांची पकड, त्यांची देहबोली, आत्मविश्वास या आधारावर १४ स्पर्धकांची निवड समितीने केली.
स्पर्धेला व्यावसायिक किनार लाभावी यासाठी मेहुल देसाई व शितल देसाई यांनी स्पर्धेचे प्रायोजकत्व स्विकारले. अंतिम फेरीसाठी डॉ. नलिनी बागूल व तनुजा महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. पहिल्या फेरीत स्पर्धकाने स्वतची ओळख करून देता आपल्यातील कलागुण सादर केले. परीक्षकांनी सर्वसामान्य ज्ञान, सध्या घडणाऱ्या घटना, यांविषयी प्रश्न विचारत स्पर्धक सामाजिक परिस्थितीविषयी किती चौकस आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दोन फेरीत स्पर्धकांमधील कौशल्य लक्षात घेत सहा स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी झाली. या फेरीत स्पर्धकांना ऑन द स्पॉट असे काही खास विषय चिट्ठीद्वारे देण्यात आले. यामध्ये मी प्राचार्या झाली तर.., मला अचानक पुण्याला जावे लागले, आदी प्रश्नांवर स्पर्धक त्यावेळेस कसा वागेल यावर त्याचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर पुन्हा एकदा शिक्षण, वैद्यकीय, चालु घडामोडी अशा विविध विषयांवर आधारीत प्रश्नोत्तराची फेरी झाल्यानंतर अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली. या अंतिम फेरीत परीक्षकांची पसंती गौरी भावे हिने मिळवली. नताशा साळवे व निकिता कनोजिया या उपविजेत्या ठरल्या. स्पर्धेतील विजेत्या तिघींना एसएनडीटी विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘तेजस्विीनी’ स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे. महाविद्यालयाच्या जाई देवलकरने याआधी ‘मिस् तेजस्विनी’ किताब पटकाविलेला असल्याने या तिघींची जबाबदारी अधिकच वाढली आहे.