रिक्षातून उडी घेतल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या स्वप्नाली लाड या तरुणीच्या उपचारांवर होणारा खर्च उचलण्याची तयारी ठाण्यातील काही राजकीय नेत्यांनी दाखविली होती. मात्र ती काम करीत असलेल्या कंपनीचे व्यवस्थापन तिच्या उपचारांचा खर्च उचलणार आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांकडून पुढे आलेला आर्थिक मदतीचा प्रस्ताव नाकारला असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. ठाणे येथील कोळशेत भागात राहणारी स्वप्नाली लाड ही तरुणी महिनाभरापूर्वी कापूरबावडी नाका रिक्षातून घरी जात होती. त्यावेळी चालक रिक्षा कोलशेतकडे जाणाऱ्या रस्त्याने नेण्याऐवजी भिवंडीच्या दिशेने घेऊन निघाला. त्यामुळे भेदरलेल्या स्वप्नालीने स्वत:च्या बचावासाठी रिक्षातून उडी घेतली. त्यामध्ये मेंदूला गंभीर इजा झाल्याने ती कोमात गेली होती. दरम्यान, तीन शस्त्रक्रियांनतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून तिला बुधवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मात्र या अपघातामुळे तिला काही प्रमाणात स्मृतीभ्रंश झाल्यामुळे त्या रात्रीची घटना आठवत नाही. त्यामुळे या घटनेचे गूढ अद्याप कायम असून आरोपी मोकाट आहेत.
ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात स्वप्नालीवर उपचार सुरू असताना शहरातील अनेक राजकीय नेत्यांनी तिचा उपचारांचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली होती. काही नेत्यांनी दहीहंडीच्या माध्यमातून तिच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला होता. असे असले तरी ती काम करीत असलेल्या कंपनीने तिच्या उपचारांचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवली असून कंपनी स्वप्नालीच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांकडून पुढे आलेला आर्थिक मदतीचा प्रस्ताव फेटाळला असल्याचे स्वप्नालीचे कौटुंबिक मित्र आनंद नरसुले यांनी स्पष्ट केले.
नगरसेविकेमुळे वाचले प्राण..
रिक्षा अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर स्वप्नालीला नगरसेविका उषा भोईर यांनी तात्काळ ज्युपिटर रुग्णालयात आणले आणि अनोळखी असतानाही रुग्णालयात दाखल करण्यासाठी ५० हजार रुपये भरले. त्यामुळेच तिला तात्काळ उपचार मिळू शकले आणि तिचे या अपघातातून प्राण वाचले. डॉक्टरांनीही तिच्यावर चांगले उपचार केले. तसेच पोलिसांनी या प्रकरणात त्यांचे काम चोख बजावले असून त्यांच्याकडून चांगले सहकार्य मिळाले. त्यामुळे या सर्वाचे आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया स्वप्नालीचे काका नीरज लाड यांनी दिली. तसेच उषा भोईर यांच्याप्रमाणे सर्वानीच वागावे, जेणेकरून इतरांचेही प्राण वाचतील, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.