शहर बस सेवेवरचे गंडांतर तुर्त तरी टळले आहे. १ जूनला होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत ही सेवा चालवणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या तोटय़ात घट कशी करता येईल यावर चर्चा होणार असून अन्य काही उपाययोजनाही करण्याचे आश्वासन महापौर व आयुक्तांनी कंपनीला आज यासंदर्भात महापौरांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत ठेकेदार कंपनीला देण्यात आले. त्यामुळे १ जुनपासून सेवा बंद करण्याची दिलेली नोटिसही या कंपनीने आज मागे घेतली.
शहरातील अवैध प्रवासी वाहतूक व आगारासाठी जागा देण्यास होत असलेला विलंब यातून शहर बस सेवेचा तोटा वाढत आहे. दरमहा तब्बल १० लाख रूपये तोटय़ात ही सेवा सुरू असून आतापर्यंत सव्वाकोटी रूपये तोटा सहन केला आहे, मात्र यापुढे हा तोटा सहन करणे कंपनीच्या आवाक्याबाहेर आहे अशी भुमिका घेत ठेकेदार असलेल्या प्रसन्न पर्पल कंपनीने मनपाला ही सेवा १ जूनपासून बंद करणार असल्याचे पत्रच दिले. बेकायदा फिरणाऱ्या ६ आसनी रिक्षांना आळा घातला जात नाही, आरटीओ, वाहतूक शाखा यांचे सहकार्य मिळत नाही अशीही त्यांची तक्रार होती.
त्यावर महापौर शीला शिंदे यांनी लगेचच आज बैठक बोलावली. आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, स्थायी समिती सभापती बाबासाहेब वाकळे, सभागृह नेते अशोक बडे, नगरसेवक संभाजी कदम, दिलीप सातपुत, नगररचनाकार विश्वनाथ दहे, सहायक आयुक्त संजीव परशरामे, यंत्र अभियंता परिमल निकम, लेखा व वित्त अधिकारी प्रदीप शेलार तसेच कंपनीच्या वतीने रोहीत परदेशी, दिपक मगर बैठकीला उपस्थित होते.
परदेशी यांनी कंपनीसमोरच्या अडचणी सांगितल्या. प्रामुख्याने बेकायदेशीर रिक्षा, ६ आसनी रिक्षा व बेशीस्त वाहतूक यामुळे ही सेवा कार्यक्षमतेने देता येणे अशक्य झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही महापालिका यात लक्ष घालत नाही. आगारासाठी जागा नसल्याने कंपनीला शब्दश: रस्त्यावर गाडय़ा थांबवून सेवा द्यावी लागते. मनपाने जागा मिळवून देऊ हे आश्वासनही पाळलेले नाही. यासर्व गोष्टींमुळे तोटा वाढत चालला आहे व आता तो सहन करण्यापलिकडे गेला आहे असे परदेशी यांनी सांगितले व त्यामुळेच सेवा बंद करत असल्याची नोटीस दिली असल्याची माहिती दिली.
नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त असलेली ही सेवा बंद पडू नये अशीच सर्व पदाधिकारी, नगरसेवकांची इच्छा आहे. अडचणी दुर करण्याबाबत प्रयत्न सुरूच आहेत असे महापौरांनी सांगितले तर आयुक्त कुलकर्णी यांनी आगारासाठी जागा देण्यात खुद्द पालकमंत्री बबनराव पाचपुते प्रयत्न करत असल्याची माहिती देऊन मनपाही यात पाठपुरावा करत आहे असे स्पष्ट केले. सभापती वाकळे, नगरसेवक बडे, कदम, सातपुते यांनीही चर्चेत भाग घेतला. डॉ. डोईफोडे यांनी कंपनीने त्यांच्या अडचणींबाबत लेखी द्यावे म्हणजे संबधित विभागांबरोबर चर्चा करून त्या सोडवणे सुलभ होईल अशी सूचना केली.
स्थायी समितीच्या १ जूनला होणाऱ्या सभेत या विषयावर सविस्तर चर्चा करण्याचे तसेच बेकायदा रिक्षाचालक, ६ आसनी रिक्षा याबाबत पोलीस, वाहतूक शाखा यांच्याबरोबर चर्चा करण्याचे आश्वासन मिळाल्यावर १ जूनची नोटीस तुर्तास मागे घेत असल्याचे परदेशी यांनी जाहीर केले.