पोलिस कन्येचे लैंगिक शोषण करणारा निलंबित कॉन्स्टेबल कृष्णात पांडुरंग कांबळे (वय २२ रा. कागल) याला शुक्रवारी तब्बल १३ दिवसानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता ३१ डिसेंबपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्याच्याकडून एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
१६ ऑक्टोबर रोजी शिवाजी विद्यापीठाच्या माळरानावर मित्रासमवेत बोलत उभ्या असलेल्या पोलिस कन्येला कृष्णात कांबळे याने अडविले होते. प्रेमप्रकरणाची माहिती घरी देण्याची भीती दाखवून तिच्या मित्राकडील सोनसाखळी त्याने काढून घेतली होती. शिवाय हेच कारण पुढे करुन कांबळे याने त्या मुलीचे लैंगिक शोषण चालविले होते. कांबळे याच्या या कृष्णकृत्यात वैतागून मुलीने पोलिस असलेल्या वडीलांना सांगितले. बाप-लेकींनी पोलिस अधिक्षकांना या घटनेची माहिती दिली. कांबळे याची चौकशी करता तो दोषी आढळल्याने त्याला निलंबित करण्यात आले. त्याच्या विरुध्द १७ ऑक्टोबर रोजी पोलिसात फ़िर्याद दाखल करण्यात आली. मात्र तेव्हापासून तो फ़रारी होता. पोलिसांच्या हातावर तुरी देत कृष्णात कांबळे गावोगाव फिरत होता. शुक्रवारी येथील मिरजकर तिकटी परिसरातील एका रुग्ण नातेवाईकास भेटण्यास आला होता. ही माहिती समजल्यावर पो.नि. बजरंग बाडीवाले व सहकाऱ्यांनी त्याला अटक केली.