18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

वाढता वाढता वाढे, वेढीले बालमंडळा!

गेल्या काही महिन्यांत अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अगदी कोवळ्या वयातील मुले अथवा तरुणांचा सहभाग असल्याचे

प्रतिनिधी | Updated: December 11, 2012 11:36 AM

गेल्या काही महिन्यांत अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अगदी कोवळ्या वयातील मुले अथवा तरुणांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. चोरी, दरोडे, अपहरण, हत्या अशा गुन्ह्यांमध्ये ही कोवळी मुले सापडली आहेत. वरकरणी सत्शील आणि सुसंस्कारित कुटुंबांमधील मुलांची यामध्ये मोठी संख्या आहे. यातील बहुतांश मुलांना या गुन्ह्यांची प्रेरणा वृत्तवाहिन्यांवरील गुन्हेविषयक विविध मालिकांमधून मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटना त्या त्या मुलांशी, त्यांच्या पालकांशी अथवा त्यांच्या गुन्ह्यांना बळी पडलेल्यांशी संबंधित आहे, असे म्हणून सोडून देण्याइतक्या साध्यासरळ नाहीत. गुन्हेगारीविषयक कार्यक्रम, मुलांचे त्याविषयी असलेले आकर्षण, त्यांना लागणारी सुखासीन आयुष्याची चटक, आईवडील आणि अन्य वडीलधाऱ्यांचे पाल्यांवरील दुर्लक्ष, बेजबाबदार प्रसारमाध्यमे आणि संपूर्ण समाजाची निष्क्रियता या साऱ्यांचा हा एकत्रित परिणाम आहे. वास्तविक हा आपल्यावर उलटलेला भस्मासूरच आहे. या गंभीर विषयाचा ‘टीम वृत्तान्त’ने केलेला हा ‘सीटी स्कॅन’!
प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे थरारक कथानक, त्यांची मती गुंग करून टाकणारे रहस्य, थोडी साहसाची चिमूट, भरीला क्रूर हिंसेची झणझणीत फोडणी ही रेसिपी सध्या १०० टक्के खपते आहे. गुन्हेगारीविषयक कार्यक्रमांना चित्रवाणी वाहिन्यांवर नेहमीच प्रेक्षक पसंती मिळत आली आहे. अर्थातच रहस्यकथानके पडद्यावर असोत की पुस्तकांच्या स्वरूपात असोत, नेहमीच खपतात. पण सध्या मात्र छोटय़ा पडद्यावरील गुन्हेगारीविषयक कार्यक्रमांना मिळत असलेला प्रतिसाद हा गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे.
दूरचित्रवाणीवर फक्त दूरदर्शन दिसायचे त्या काळातही करमचंद, हॅलो इन्स्पेक्टर, एक शून्य शून्य, कानून, राजा और रँचो, फेलूदा, ब्योमकेश बक्षी, भँवर अशा मालिकांची चलती होती. अन्य वाहिन्यांही यात अर्थातच मागे नव्हत्या. सोनी टीव्हीवरील सीआयडी ही मालिका तर गेली १५ वर्षे अव्याहतपणे गुन्ह्यांची उकल करीत आहे.
सध्या एकटय़ा सोनी टीव्हीवर गुन्हेगारीविषयक तीन मालिका सुरू आहेत. विशेष म्हणजे ‘सीआयडी’, ‘क्राइम पॅट्रोल’ आणि ‘अदालत’ या तिन्ही मालिका दणक्यात सुरू आहेत, त्यांचा टीआरपीसुद्धा उत्तम आहे. त्याशिवाय जवळपास प्रत्येक हिंदी वाहिनीने आपला एक विशेष गुन्हेविषयक कार्यक्रम २०१२ मध्ये सुरू केला आहे. यात चॅनल व्ही, कलर्स, लाइफ ओके आणि स्टार प्लस आदी सगळ्याच वाहिन्यांचा समावेश आहे. चॅनल व्हीवर ‘गुमराह’, कलर्सवर ‘शैतान’, लाइफ ओकेवर ‘सावधान इंडिया’ आणि स्टार प्लसवर ‘एसीपी अर्जुन’ या कार्यक्रमांमध्ये गुन्हेगारी जगताची खबर घेतली जाते. यातील बरेचसे कार्यक्रम हे कल्पना आणि वास्तव यांचे मिश्रण या स्वरूपाचे आहेत. तर ‘क्राइम पॅट्रोल’मध्ये सत्य घटनांचा मागोवा घेतला जातो. हे सर्वच कार्यक्रम संध्याकाळी किंवा रात्री १० च्या दरम्यान दाखवले जातात.    
आपण टाळू शकत नाही
गुन्हेविषयक कार्यक्रमांची लोकांमध्ये आवड आहे, ही वस्तुस्थिती आपण टाळू शकत नाही. मग असे असताना आपण त्या कार्यक्रमांत काय दाखवायचे आणि किती दाखवायचे, हा विचार करणे गरजेचे आहे. एखादा गुन्हा बुद्धिकौशल्याने आणि कमीत कमी हिंसा दाखवून कसा उलगडता येतो, हे दाखवणे योग्य ठरते. तोच आमचा प्रयत्न असतो. अशा कार्यक्रमातून गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना नवनवीन क्लृप्त्या मिळतील, असे काही दाखवू नये.
बी पी सिंग, दिग्दर्शक, सीआयडी (एका मुलाखतीतून)
गुन्हा म्हणजे खून नाही
‘गुन्हा म्हणजे केवळ खून, ही संकल्पना डोक्यातून काढून टाकायला हवी. कोणत्याही गुन्हेविषयक कार्यक्रमात सामान्य माणसाला आवडतील, अशा सर्व गोष्टींचे रसायन ओतप्रोत भरलेले असते. त्यामुळे सामान्य माणूस हे कार्यक्रम अत्यंत चवीने पाहतो. नेमके कुठे काय चुकले आणि ते कसे दुरुस्त करता आले असते, हा विचार असे कार्यक्रम पाहताना प्रत्येक जण करत असतो.’
सुब्रह्मणीयन एस. अय्यर, दिग्दर्शक, क्राइम पॅट्रोल
(एका मुलाखतीतून)
टीव्ही कार्यक्रम पाहण्यासाठी कुटुंबाची आचारसंहिता हवी – डॉ. आनंद नाडकर्णी
गुन्हेगारीची मानसिकता मनोसामाजिक असतेच असे नाही. त्याला जनुकीय कारणेही असतात. आपल्याला फार तर दोन-तीन पिढय़ांतील पूर्वजांविषयी माहिती असते. परंतु, जीवशास्त्रीय घटकांच्या आधारे पाहिले तर एखाद्या सुसंस्कारित घरातील व्यक्तीमध्येही गुन्हेगारी प्रवृत्ती असते, असे मानसशास्त्रीय स्पष्टीकरण दिले जाते. कमी परिश्रम करून जास्तीत जास्त सुख मिळविण्याचा हव्यास सध्या वाढला आहे. वाट्टेल त्या मार्गाने सुख मिळविणे हे टीव्ही पाहून तरुण शिकतात. पूर्वी घरात आणि शाळेत जीवनमूल्यांचे संस्कार प्रभावीपणे होत. आजघडीला या व्यवस्थांमधून मूल्यशिक्षण किती दिले जाते, हे प्रत्येकानेच तपासून पाहावे. घरातील मुलांनी काय पाहायचे हे पालकांनी ठरविण्यापेक्षा संबंध कुटुंबाची टीव्ही पाहण्याविषयी आचारसंहिता हवी. सकारात्मक गोष्टी दाखविणारे कार्यक्रम पाहिले जातील, असे वातावरण प्रयत्नपूर्वक तयार करावे लागेल. अर्थात दोष प्रसिद्धी माध्यमांचाही आहे. चांगल्या, सकारात्मक गोष्टी लोकांपुढे आणल्या पाहिजेत. परंतु, तसे फारसे होत नाही. लोकांसमोर आदर्श कोणाचा ठेवता यावरही बरेच काही अवलंबून आहे.
समुपदेशनाची नितांत गरज – डॉ. विलास डोंगरे
कुटुंबात मुले आणि आई-बाबा फार कमी वेळ एकत्र येतात. मुलांना वेळ देता येत नाही, असे पालक सांगतात. अनेक उच्चभ्रू घरांमध्ये तर मुले स्वत:च्या स्वतंत्र खोलीत बसून तासन्तास टीव्ही पाहतात. पौगंडावस्थेतील मुले, विशीपंचविशीतील तरूण यांना टीव्हीशिवाय दुसरा काहीच विरंगुळा नसतो. मैदानी खेळ तर गायबच झाले आहेत. त्यामुळे संस्कारक्षम वयात या तरुणांना वेळ चांगल्या पद्धतीने घालविण्यासाठीच्या साधनांची सध्या पूर्ण वानवा आहे. पैसा या एकाच उद्देशाने पछाडलेला समाज झालाय. टीव्हीवर काय पाहायचे यावर पालकांचे नियंत्रण हवे. न्याय व्यवस्थाही अशा गुन्हेगारांना शिक्षा ठोठावते. पण त्यामुळे असे तरूण गुन्हेगार सुधारत नाहीत. उदाहरणार्थ दिल्लीमध्ये एका तरुणाने गाडी चालवताना अपघात झाला म्हणून त्याला न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयाने त्या तरुणाला रोज दोन-तीन तास वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी पाठविले. यातून त्याला अपघात टाळण्यासाठी काय करायला हवे याची समज आली. गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी उपाय करायला हवेत. तर तरुणांची गुन्हेगारी रोखता येईल. यासाठी शाळांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
गुन्हेमालिकांच्या प्रभावाचा परिणाम    
ऑक्टोबर २०१२
*  कांदिवलीत राहणारा एक किशोरवयीन तरुण. त्याला पैशांची चटक लागली. आपल्या काकांकडे खूप पैसे आहेत, असा त्याचा समज झाला. ते पैसे कसे मिळवायचे याचा विचार करीत असताना आपल्या काकांचा ८ वर्षांचा मुलगा धीरज याच्या अपहरणाचा कट त्याने रचला. शेजारीच राहणाऱ्या धीरजला खेळण्यासाठी बोलावले आणि त्याचे अपहरण केले. त्याने आरडाओरड केल्यानंतर त्याचा गळा आवळून खून केला. एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्याचा मृतदेह नाल्यात टाकून दिला. एवढा मोठा कट त्याने कसा रचला याचा शोध घेतला असता सोनी टीव्हीवरील ‘क्राइम पॅट्रोल’ मालिका पाहून ही युक्ती सुचल्याचे त्याने सांगितले.

* गोवंडी येथून मुद्दसर शेख या १० वर्षांच्या मुलाचे अपहरण झाले. पोलिसांनी त्याच्या अपहरणकर्त्यांला अटक करून गुजरातमधून मुद्दसरची सुटका केली. अटक केलेला आरोपी गुड्डू हा मुद्दसरचाच लांबचा नातेवाईक होता. त्यालाही पैसे मिळविण्याची कल्पना एका गुन्हेगारीविषयक मालिकेतूनच मिळाली. गुड्डूसुद्धा काही सराईत गुन्हेगार नव्हता. पण मालिका पाहिल्यानंतर झटपट पैसे मिळतात, असा समज झाल्यावर त्याने हे कृत्य केले होते.

सप्टेंबर २०१२
* कांदिवलीच्या एकता नगरमध्ये राहणारा मनिष गौड हा तरूण. त्याला मौजमजेसाठी पैसे हवे होते. क्राइम पॅट्रोल पाहताना त्याने एका श्रीमंत माणसाच्या मुलाचे अपहरण झाल्यावर तो मुलाच्या सुटकेसाठी पैसे देतो हे पाहिले. अपहरण करणे तर फार सोपे आहे, असे त्याला वाटले आणि त्याने सागर शर्मा (५) या मुलाला फिरण्यासाठी बोलावून त्याचे अपहरण केले. सागरला मित्राच्या घरी ठेवू आणि त्याच्या वडिलांकडून पैसे उकळू अशी त्याची योजना होती. परंतु त्या मित्राने नकार दिल्यानंतर मनिषने सरळ सागरची गळा आवळून हत्या केली. पळवून नेल्यानंतर अवघ्या तासाभरात त्याने सागरची हत्या केली होती. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतरही सागरच्या वडिलांकडून ५० हजारांची खंडणी मागण्याइतके निर्ढावलेपण मनिषने कमावले होते.

ऑगस्ट २०१२
* बोरिवलीत एका कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या रईस चौधरी याला पैशांची गरज होती. प्रेयसीला घर घेऊन देण्यासाठी त्याला पैसे हवे होते. परंतु मेहनत करून पैसे मिळणार नाही हे तो समजून चुकला. यासाठी त्याने ठेकेदार रामसागर प्रजापती यांचा ५ वर्षांचा मुलगा अजय याच्या अपहरणाचा कट रचला. अपहरण कसे करायचे, मुलाला कुठे ठेवायचे याची कल्पना त्याला सीआयडी मालिका पाहून आली. अजयला तो ओळखायचा. शाळा सुटल्यावर त्याने अजयला फिरण्यासाठी म्हणून नेले आणि एक लॉज गाठले. दुसऱ्याच्या नावाने असलेल्या मोबाईलवरून त्याने अजयच्या वडिलांना खंडणीसाठी फोन केला. पण पोलिसांनी तत्परता दाखवून अवघ्या काही तासांच रईस चौधरीला अटक करून अजयची सुटका केली.
 
गेल्या काही महिन्यातल्या या घटना. टीव्हीवर सध्या गुन्हेविषयक मालिकांचे प्रमाण वाढले आहे. परंतु असे कार्यक्रम पाहून गुन्हे होण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. पोलिसांनाही याची गंभीर चिंता वाटू लागली आहे. कांदिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंपळे यांनी सांगितले की, ही मुले सराईत नसतात. मालिका पाहून असा गुन्हा करणे त्यांना सोपे वाटू लागते. वास्तविक असे शक्य नसते. मालिकांचा उद्देश चांगला असतो, पण घडते भलतेच. पोलीस निरीक्षक सुधाकर शिंदे यांनी अवघ्या चार तासात अपहृत अजय प्रजापती याची सुखरूप सुटका केली होती. ते म्हणाले, गुन्हेगारीविषयक मालिकांमधून गुन्हे करण्याची प्रेरणा मिळत आहे, हे दुर्दैवी आहे. अशा मालिका गुन्हा घडताना आणि आरोपी पकडताना दाखवितात. परंतु एखादा गुन्हा केल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात हे त्या दाखवत नाहीत. त्यामुळे मुलांना त्याचे गांभीर्य समजत नाही. गुन्हेविषयक मालिकांनी गुन्ेहगारांनी होणाऱ्या शिक्षा आणि त्यांना भोगावे लागणारे परिणाम दाखवायला हवेत अशी गरज त्यांनी व्यक्त केली. मुंबईतच नव्हे तर देशभरात अशा गुन्हेमालिका पाहून खरोखरच गुन्हे घडत आहेत. कधी चित्रपट पाहून तर कधी मालिका पाहून. गुन्हे आणि गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्याचा उद्देश नसला तरी वाईट असेल ते लवकर स्वीकारलं जात असल्याने असे प्रकार घडत आहेत.    

गुन्हेगारी मालिका पाहून
घडलेले आणखी काही गुन्हे-
*  पुणे- एप्रिल २०१२ मध्ये एका सराफाच्या मुलाचे त्याच्याच वर्गमित्रांनी अपहरण केले. १५ वर्षांचा हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मित्रांनी त्याला शहराबाहेर नेऊन त्याची हत्या केली. त्याच्या वडिलांकडून त्यांनी ५० हजारांची खंडणी मागितली होती. सीआयडी मालिका पाहून त्यांनी हे कृत्य केले होते.
*  मणीनगर, अहमदाबाद (एप्रिल २०१२)- हार्दिक जिन्गर आणि कमलेश पटेल या महाविदयालयीन तरुणांनी एटीम सेंटरमध्ये लाखो रुपयांची चोरी केली. एका मालिकेत अशा प्रकारची चोरी करताना दाखविले होते आणि आपण तीच पद्धत वापरल्याचे या दोघांनी पोलिसांना सांगितले.
 
*  अहमदाबाद (२००७)- ध्येय खांबू या ६ वर्षांच्या मुलाचे अपहरण आणि हत्या. सनसनी हा कार्यक्रम पाहून हे कृत्य केल्याची मारेकऱ्याची कबुली
 
*  चेन्नई (फे ब्रुवारी २०१२)- शिक्षिका वर्गात ओरडली म्हणून १५ वर्षांंच्या मुलाने तिच्यावर चाकूने हल्ला केला. हृतिक रोशनच्या अग्निपथ चित्रपटात पाहून आपण हे कृत्य के ल्याचे त्याने सांगितले.
 
* दिल्ली (२००४) हम से है जमाना हा चित्रपट आदल्या रात्री पाहिल्यानंतर नोकरांनी लष्करातील एक वरिष्ठ अधिकारी आणि त्याच्या पत्नीची चोरीसाठी हत्या केली.   

First Published on December 11, 2012 11:36 am

Web Title: crime shows are increasing and childrens are more involved in crime