चुकीच्या वैद्यकीय उपचारांमुळे एका दोन वर्षांच्या मुलीला दोन्ही डोळे गमवावे लागल्याची घटना शहरात घडली. या प्रकरणी दत्त चौकातील वरद नवजात शिशू व बाल रुग्णालयातील डॉ. विक्रम दबडे यांच्या विरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शांतमल्लप्पा शिवपादप्पा टक्कळकी (रा. दुधनी, ता. अक्कलकोट) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार व नंतरच्या पाठपुराव्यानुसार प्राथमिक चौकशी होऊन त्यात प्राथमिक स्तरावर सत्य आढळून आल्याने पोलिसांनी संबंधित डॉक्टरविरुध्द गुन्हा दाखल केला. शांतमल्लप्पा टक्कळकी यांची पत्नी संगीता ही सुयश नर्सिग होममध्ये १३ ऑक्टोबर २०११ रोजी सातव्या महिन्यात मुदतीपूर्व प्रसूत होऊन तिला कन्यारत्न झाले. प्रसूती मुदतपूर्व असल्याने नवजात बाळाला डॉ. साधना देशमुख यांनी नवजात व बालरोगतज्ज्ञ डॉ. विक्रम दबडे यांच्या वरद नवजात शिशू व बालरुग्णालयात उपचारांसाठी नेण्यास सांगितले होते. त्यावेळी डॉ. दबडे यांच्या रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढल्याने जागेअभावी त्यांनी स्वत:च्या निगरानीखाली सिटी हॉस्पिटलमध्ये सदर नवजात शिशू रुग्णावर उपचार केले. नंतर त्यास स्वत:च्या वरद नवजात शिशू व बालरुग्णालयात हलविले. परंतु चुकीच्या वैद्यकीय उपचारांमुळे नवजात शिशूचे दोन्ही डोळे कायमस्वरूपी वाया गेले. ती पूर्णत: अंध झाली. सदर मुलीचे वय सध्या दोन वर्षांचे असून तिला मुंबई, चेन्नई, हैदराबाद आदी ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले. परंतु त्याचा फायदा झाला नाही. अंध चिन्नमलिका ही आई-वडिलांना एकुलती एक कन्या आहे.