पुनर्मूल्यांकनामध्ये विद्यार्थ्यांचे गुण वाढवून त्यांना उत्तीर्ण केल्याप्रकरणी पुणे विद्यापीठातील अटक केलेले विद्यापीठाचे उपकुलसचिव लालसिंग वसावे, सहायक कुलसचिव डॉ. राजेंद्र पंडित यांच्यासह सातजणांच्या पोलीस कोठडीत १९ जानेवारीपर्यंत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले, तर पूर्वी अटक केलेल्या तीन लिपिकांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले.
विद्यापीठाचे उपकुलसचिव वसावे, सहायक कुलसचिव डॉ. पंडित यांच्यासह वरिष्ठ लिपिक सुरेंद्र नायडू, नंदा पवार, ओमानचे विद्यार्थी अलमीर हमीन, ओबेद रेहमान आवारी आणि भारतीय विद्यार्थी मोहसीन मेहबूब शेख यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे, तर विद्यापीठातील कर्मचारी रमेश किसन शेलार, अशोक शंकरराव रानवडे आणि चेतन गजानन परभाणे याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
पुनर्मूल्यांकन विभागामध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण वाढवून दिले जात असल्याचे समोर आल्यानंतर सुरुवातीला शेलार, रानवडे, परभाणे यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडील चौकशीत इतरांची नावे स्पष्ट झाली. त्यानुसार तीन विद्यार्थ्यांसह सात जणांस अटक केली होती. त्यांना अटक केल्यानंतर पूर्वीचे तिघे व हे सातजण यांना न्यायालयाने १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. त्याची मुदत आज संपत असल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी आरोपींची कोठडी वाढवून देण्याची मागणी सहायक सरकारी वकील ए. के. पाचरणे यांनी केली. त्यांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने पहिल्यांदा अटक केलेल्या तिघांना न्यायालयीन कोठडी तर सातजणांस पोलीस कोठडी सुनावली.

पुणे विद्यापीठातील ‘गुणवाढ’ प्रकरण आणखी पुढे सरकत असल्याचे संकेत बुधवारी मिळाले. या प्रकरणात आधीच उपकुलसचिवांना अटक करण्यात आली आहे. आता आणखी दोन उपकुलसचिवांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याच्या चर्चेमुळे विद्यापीठातील वातावरण ढवळून निघाले. दरम्यान, आधीच अटकेत असलेले उपकुलसचिव व सहायक कुलसचिव यांच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ करण्यात आली.