सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जुळे सोलापूर विकास आराखडय़ासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीवरून वादंग माजले. जुळे सोलापूर विकास आराखडा समितीमध्ये स्थानिक नगरसेवकांना डावलून अन्य भागातील व स्वमर्जीतील नगरसेवकांची वर्णी लावल्याने पालिका सभागृह नेते महेश कोठे यांच्यावर स्वपक्षीय नगरसेवकांकडूनच टीकास्र सोडण्यात आले. त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली.
महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर अलका राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी म्हाडा क्षेत्र असलेल्या जुळे सोलापूर भाग एक व दोनच्या विकास आराखडय़ाच्या विषयावर सुनावणी घेण्यासाठी स्थायी समितीतील प्रत्येकी तीन सदस्यांची समिती गठीत करण्याचा विषय सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला होता. सभागृह नेते महेश कोठे यांनी या समितीत दत्तू बंदपट्टे, गीता मामडय़ाल, उदयशंकर चाकोते, चेतन नरोटे, मेघनाथ येमूल व इब्राहीम कुरेशी यांच्या नियुक्तीचा ठराव मांडला. या ठरावास भाजपने विरोध करून स्थानिक नगरसेवकांनाच या समितीमध्ये सामावून घेण्याची उपसूचना मांडली. परंतु सत्ताधारी काँग्रेस आघाडीची सूचना बहुमताने मंजूर झाली.    
तथापि, या विषयावर सत्ताधारी काँग्रेसअंतर्गत वाद पुन्हा चवाटय़ावर आला असून यात सभागृह नेते कोठे यांच्याविरुद्ध हटावाचा नारा देण्यात आला. पक्षाच्या बठकीत या विषयावर चर्चा न घडविता आणि धोरण न ठरविता सभागृह नेते कोठे यांनी सभागृहात आपल्या मर्जीतील नगरसेवकांची परस्पर वर्णी लावली. विकास आराखडा होणाऱ्या भागातील एकाही नगरसेवकाला संधी दिली नाही, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक नागेश ताकमोगे यांनी करून कोठे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. ताकमोगे हे काँग्रेसचे आमदार दिलीप माने यांचे कट्टर समर्थक समजले जातात.