शाही विवाह सोहळय़ामुळे अडचणीत आलेले सांगलीचे महापौर इद्रीस नायकवडी हे आता राजकीयदृष्टय़ाही पेचात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील यांनी महापौर नायकवडी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध उरला नसल्याचे स्पष्ट करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.     
सांगलीतील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष पाटील यांनी इद्रीस नायकवडी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. ते म्हणाले, इद्रीस नायकवडी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काही संबंध उरलेला नाही. यापूर्वी त्यांना शहराध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. आता त्यांचे सामान्य सदस्यपदही रद्द केले पाहिजे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यापैकी कोणालाही ते मानत नाहीत. सध्या ते भाजप व काँग्रेसच्या वळचणीला गेले आहेत. या पक्षाने त्यांचे पालकत्व स्वीकारायचे आहे. महापालिकेच्या सत्तेमध्ये राष्ट्रवादीचा संबंध उरलेला नाही.    
    सांगलीत झालेल्या महापौर परिषदेचा उल्लेख करून दिनकर पाटील म्हणाले, ही संपूर्ण परिषद काँग्रेसच्या छत्रछायेखाली पार पडली. परिषदेस काँग्रेसचे मंत्री उपस्थित होते. नायकवडी यांच्याकडे परिषदेचे यजमानपद होते. परिषदेला काँग्रेसच्या लोकांना बोलावून त्यांनी आपण काँग्रेसचे झालो असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीशी कसलाही संबंध ठेवू न इच्छिणाऱ्या नायकवडी यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.
नायकवडींसमोर आणखी संकट
शाही विवाहामुळे इद्रीस नायकवडी हे चर्चेत आले असताना या विवाहावेळी त्यांनी राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या पुत्राच्या विवाहावेळी महापालिकेतील महासभेवेळी शासकीय गणवेशात असणारा कर्मचारी पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभा केला होता. वास्तविक या शिरस्तेदाराने शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणे गरजेचे असते. पण घरच्या कार्यक्रमालाही नायकवडी यांनी शिरस्तेदारास पाहुण्यांना सलाम ठोकण्यासाठी उभे केल्याने टीका होत आहे. या कृतीतून त्यांनी घटनात्मकपदाचे उल्लंघन केले जात असल्याची टीका होत आहे. याबाबत भाजपचे नेते विनोद तावडे यांनी नायकवडी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, विवाह हा आपला व्यक्तिगत कार्यक्रम आहे. त्याचा समाजाशी संबंध नाही, असे नायकवडी म्हणत आहेत. असे असताना ते महापालिकेच्या कर्मचाऱ्यास शासकीय गणवेशात विवाहासाठी उभे करतात हे अयोग्यच नव्हे तर नियमाची पायमल्ली करणारे आहे.