राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सोलापूर भेटीच्या पाश्र्वभूमीवर प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने हाती घेतली असताना त्यात हस्तक्षेप करून एका कर्मचाऱ्याला उपमहापौर हारून सय्यद यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला. मात्र अखेर प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागताच उपमहापौरांनी माफी मागितली. त्यामुळे या वादावर पडदा पडला.
येत्या २९ डिसेंबर रोजी मुखर्जी हे सोलापूरच्या भेटीवर येत आहेत. त्यामुळे विमानतळापासून ते पार्क चौकापर्यंतच्या व्हीआयपी रस्त्यावरील छोटी छोटी अतिक्रमणे हटविण्याची मोहीम पालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत होटगी रस्त्यावरील आसरा सोसायटी चौकात एक टपरी जप्त करण्यात आली. ही टपरी उपमहापौर हारून सय्यद यांच्या कार्यकर्त्यांची होती. या कार्यकर्त्यांने अतिक्रमण काढण्यास विरोध करीत उपमहापौरांना बोलावून घेतले. उपमहापौर सय्यद यांनी अतिक्रमण हटविणाऱ्या एका कर्मचाऱ्याला जप्त केलेल्या दोन खुच्र्या परत देण्यास फर्मावले. परंतु त्यास नकार मिळताच संतापलेल्या उपमहापौरांनी त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. तेव्हा संतप्त झालेल्या कर्मचाऱ्याने पोलिसात फिर्याद दाखल करण्यासाठी थेट पोलीस चौकी गाठली.
दरम्यान, हे प्रकरण अंगलट येताच व त्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी होण्याची चिन्हे दिसताच उपमहापौर सय्यद यांनी नरमाईची भूमिका घेत महापौर अलका राठोड यांच्या दालनात संबंधित कर्मचारी व पालिका कर्मचारी संघटनांच्या नेत्यांसमोर माफी मागितली. त्यावर हे प्रकरण पुढे न वाढता थंड झाले. पंधरा दिवसांपूर्वी भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पालिकेतील एका कनिष्ठ अभियंत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी नगरसेवक सुरेश पाटील यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ताजी असतानाच उपमहापौर हारून सय्यद यांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला. परंतु तो सामोपचाराने मिटविण्यात आला.