अनेकवेळा सूचना देऊनही प्रवेश प्रक्रियेमध्ये आवश्यक ते बदल न केल्यामुळेच स. प. महाविद्यालयावर कडक कारवाई करण्यात आल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले. कोणत्याही महाविद्यालयावर इतकी कडक कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, स.प. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारी कुलगुरूंची भेट घेतली.
प्रवेश प्रक्रियेमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी व्यवस्थापन परिषदेने स. प. महाविद्यालयावर कारवाई करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला होता. त्याप्रमाणे महाविद्यालयाला एक लाख रुपये दंड, पुढील वर्षांसाठी स. प. महाविद्यालयातील ऑरगॅनिक केमेस्ट्रीच्या प्रवेश क्षमतेमध्ये दहा टक्क्य़ांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशाप्रकारे एखाद्या महाविद्यालयावर इतकी कडक कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. स.प. महाविद्यालयाला या प्रकरणी अनेक वेळा लेखी सूचना करूनही त्यांनी कार्यवाही न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. प्रवेश प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी महाविद्यालयाला पुरेसा वेळ देण्यात आला होता. किंबहुना नियमानुसार नवी प्रवेश यादीही तयार करून देण्यात आली होती. मात्र, महाविद्यालयाने त्याबाबत काहीही कार्यवाही केली नसल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, स.प. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी कुलगुरूंची भेट घेतली. याबाबत कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले, ‘‘महाविद्यालयाला पुरेशी संधी देण्यात आली होती. मात्र, महाविद्यालयाने कार्यवाही न केल्यामुळे व्यवस्थापन परिषदेने महाविद्यालयाला दंड केला आहे. त्यामध्ये महाविद्यालयाला कोणत्याही प्रकारे सूट देण्यात येणार नाही.’’