मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा उद्या शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता सोलापूरच्या नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर होणार आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू असून त्यासाठी मनसेचे १२ आमदार शहरात दाखल होऊन सभेच्या नियोजनाची सूत्रे ताब्यात घेतली आहेत. कोल्हापूर व खेडप्रमाणे सोलापूरच्या सभेसही उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून सभेची तयारी होत आहे.
राज ठाकरे हे उद्या शुक्रवारी सकाळी सिध्देश्वर एक्स्प्रेसने सोलापुरात दाखल होणार आहेत. दिवसभर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्थानिक मान्यवरांशी चर्चा असा त्यांचा कार्यक्रम असून सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे दोघे दिग्गज नेते सोलापूर जिल्ह्य़ातून लोकसभेवर प्रतिनिधित्व करीत असूनदेखील या जिल्ह्य़ाची होत असलेली अधोगती, विशेषत: भीषण दुष्काळाचे संकट ओढवले असताना त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना न आखता चारा छावण्या व टँकरने पाणीपुरवठा या तात्पुरत्या उपायांसाठी उपलब्ध झालेला निधी व त्यातून निर्माण झालेले चारा व टँकरमाफिया, पाण्याअभावी शेतकरी व मुक्या जनावरांची होत असलेली परवड, सोलापूरच्या उजनी धरणातील पाण्याचे चुकलेले नियोजन, या धरणात पुणे जिल्ह्य़ातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरली असताना त्याकडे पवार काका-पुतण्यांनी केलेले साफ दुर्लक्ष, उलट, कर्नाटकातील आलमट्टी धरणातून पाणी आणण्याचे आश्वासन देऊनही त्याबाबतही घेतलेली उदासीनता आदी मुद्यांवर राज ठाकरे यांची तोफ धडाडण्याची अपेक्षा आहे. एकीकडे सोलापूर जिल्ह्य़ातील शेतकरी व मुकी जनावरे पाण्याअभावी तडफडत असताना दुसरीकडे बारामतीसह पुणे जिल्ह्य़ात उद्योगासाठी होत असलेला पाण्याचा उपसा, या पाश्र्वभूमीवर पवार काका-पुतण्याबद्दल सोलापूरकरांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असताना त्यावर राज ठाकरे काय बोलणार, याविषयी सोलापूरच्या युवावर्गात उत्सुकता वाढली आहे.
मनसेची उभारणी केल्यानंतर राज ठाकरे यांची सोलापुरातील ही पहिलीच जाहीर सभा होत आहे. कोल्हापूर व खेड येथे त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे साहजिकच सोलापुरातील सभेसही उच्चांकी गर्दी होण्याची अपेक्षा आहे. परंतु त्याचा अचूक अंदाज न आल्याने मनसेच्या स्थानिक शाखेने सभेसाठी नॉर्थकोट प्रशालेचे मैदान आरक्षित केले. कोल्हापूर व खेडच्या सभांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर सोलापुरातही तोच अनुभव येण्याची शक्यता गृहीत धरून नॉर्थकोट मैदानाऐवजी अन्य मोठे मैदान उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले गेले. परंतु कोठेही मैदान उपलब्ध न झाल्याने अखेर नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावरच राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. या सभेच्या वेळी सभास्थळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही तसेच मोठे स्क्रीन लावण्यात येणार आहेत. सुमारे पाचशे पोलिसांचा ताफा सभेच्या बंदोबस्तासाठी तैनात केला जाणार आहे.