अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची साथ पसरली असून चार दिवसांनंतरही साथ आटोक्यात आली नसून साथीचे आणखी सहा रुग्ण आढळले आहेत. बाधित रुग्णांची संख्या ११० च्या वर पोहोचली आहे. दरम्यान, गावातील जलवाहिनीचा पाणीपुरवठा खंडीत करून दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगण्यात आले.
कडबगावची लोकसंख्या २४५० एवढी असून दूषित पाण्यातून गावात गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. अनेकांना एकाच वेळी उलटी-जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुनील भडकुंबे व अतिरिक्त आरोग्याधिकारी डॉ. आर. जी. पराडकर यांच्या पथकाने गावात धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. बहुसंख्य रुग्णांवर गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात उपचार करण्यात आले. रुग्णांवर उपचारांसाठी वैद्यकीय पथके साथ नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान, गॅस्ट्रोच्या साथीची माहिती मिळताच आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी तातडीने कडबगावला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली व रुग्णांवर चांगल्याप्रकारे औषधोपचार करण्याच्या तसेच शुध्द पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गावातील सार्वजनिक नळपाणीपुरवठा खंडीत करण्यात आला असून त्याऐवजी दोन टँकरद्वारे गावाला पाणी पुरविण्यात येत आहे. याशिवाय विंधन विहिरींतूनही पाणी उचलण्यात येत आहे.