दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर येथील नगरपालिका कर्मचाऱ्यांना त्यांची विविध देणी देण्याचा निर्णय कामगार संघटना व प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. कामगार राखीव फंडातून त्यांची देणी देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
दिवाळीनिमित्त देय रकमेविषयी विविध कामगार संघटनांतर्फे धरणे, काम बंद आंदोलन, आमरण उपोषण अशा पद्धतींनी आंदोलन केले गेले. कामगार सेना व फेडरेशनच्या वतीने पालिका कार्यालयासमोर आंदोलन झाले. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी संघटनांना चर्चा करण्यासाठी बोलावले. त्यामध्ये सिटूचे राज्य पदाधिकारी डॉ. डी. एल. कराड, शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष बळीद, रिपाइंचे गंगादादा त्रिभुवन, गणेश धात्रक, साईनाथ गिडगे, मुख्याधिकारी संजय केदार यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यानुसार सहाव्या वेतन आयोगांतर्गत १० हजार रुपये, १५ महिन्यांच्या महागाई फरकापैकी ११ महिन्यांच्या महागाईचा फरक देणे, सणासाठी आगाऊ पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत. किमान वेतन कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचे वेतन, भत्त्याचा फरक, सणासाठी आगाऊ रक्कम तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगापोटी सात हजार रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. बैठकीस कामगार सेनेचे अध्यक्ष नितीन पाटील, दीपक पाटोदकर, विजय जगताप, मिलिंद पुरंदरे, सिटूचे अध्यक्ष गणेश गरुड, रामदास पगारे आदींसह मोठय़ा संख्येने कामगार उपस्थित होते.