सांगली महापालिकेच्या तळमजल्यावरील वीजकळ केंद्रात मंगळवारी सायंकाळी शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. कर्मचा-यांनी तातडीने हालचाल करून ही आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. मात्र आगीमुळे सायंकाळी ५ नंतर महापालिकेतील विद्युतपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता.
महापालिकेच्या तळमजल्यावरील अंधा-या खोलीत वीज मंडळाकडून येणा-या व विविध विभागात वितरित केल्या जाणा-या स्विच बोर्डाचे जाळे आहे. आज सायंकाळी विद्युत मंडळाकडून अचानकपणे जादा दाबाने वीज उपलब्ध झाल्याने कळयंत्रात आग लागली.
अग्निशमन सिलिंडरने कर्मचा-यांनी आग विझवण्याचा तात्काळ प्रयत्न केला, त्यामुळे लगतच असणा-या विविध विभागांना याची झळ बसली नाही, मात्र या प्रकारामुळे महापालिकेत काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी विजेसाठी जनरेटरची सोय महापालिकेत उपलब्ध आहे, मात्र आगीमध्ये कळयंत्रणेतच बिघाड झाल्याने जनरेटरची वीजही उपलब्ध होऊ  शकली नाही. रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते.