15 December 2017

News Flash

पाचगावच्या माजी सरपंचांचा गोळ्या घालून खून

कोल्हापूर जिल्ह्य़ातील पाचगावचे माजी सरपंच अशोक मारुती पाटील यांचा आज दुपारी गोळ्या घालून खून

प्रतिनिधी, कोल्हापूर | Updated: February 13, 2013 9:15 AM

कोल्हापूर जिल्ह्य़ातील पाचगावचे माजी सरपंच अशोक मारुती पाटील यांचा आज दुपारी गोळ्या घालून खून करण्यात आला. ते आमदार महादेवराव महाडिक यांचे कट्टर समर्थक होते. पाचगाव येथे सत्तेच्या वर्चस्वातून आमदार महाडिक व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यामध्ये टोकाचे वैमनस्य असून राजकीय श्रेष्ठत्वातून हा खून झाल्याची चर्चा आहे.
पाटील यांचा मुलगा मिलिंद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत दिलीप जाधव डी. जे. यांच्यासह आणखी दोघांनी खून केला असल्याचा संशय राजवाडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत केला आहे. दरम्यान आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा देत त्यांचे शेकडो समर्थक उशिरापर्यंत छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या परिसरात थांबले होते. या प्रकारामुळे पाचगावात प्रचंड तणाव निर्माण झाला असून तेथे मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खुनाची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पाच पथके रवाना केली आहेत.    
कोल्हापूर शहराला लागूनच पाचगाव ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आमदार महाडिक व गृहराज्यमंत्री पाटील यांच्यात नेहमीच संघर्ष सुरू असतो. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत पाटील गटाने बाजी मारली होती. आरक्षित असलेल्या सरपंचपदी महाडिक गटाचा उमेदवार निवडून येण्याची चिन्हे होती. तथापि पाटील गटाने यंत्रणा गतिमान करून एका उमेदवाराचा आरक्षित जागेसाठीचा जातीचा दाखला मिळविला. त्या आधारे पाचगाव ग्रामपंचायतीवर सत्ता व सरपंचपद दोन्ही मिळविण्यास हा गट यशस्वी ठरला. त्याचवेळी पाचगावात संघर्ष घडला होता. या घटनेचे पडसाद ताजे असतानाच माजी सरपंच अशोक पाटील यांचा दुपारी खून झाल्याने एकच खळबळ उडाली.    
१९९७ च्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर अशोक पाटील सरपंच बनले होते. बुधवारी म्हाडा कॉलनी येथे गणेश जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या महाप्रसादाच्या कार्यक्रमास ते सहकाऱ्यांसमवेत गेले होते. तेथून परताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. हल्लेखोर लगेचच पसार झाले. पाटील यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मृत झाल्याचे घोषित केले. पाटील यांचा खून झाल्याचे समजल्यावर आमदार महादेवराव महाडिक, भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांच्यासह महाडिक समर्थक तसेच पाचगावातील शेकडो ग्रामस्थ इस्पितळात आले. महाडिक यांनी हल्ला कशाप्रकारे झाला याची माहिती घेतली.
पाटील यांच्या पत्नी, मुले व कुटुंबीय काही वेळात इस्पितळात दाखल झाले. त्यांचा आक्रोश हृदय पिळवून टाकणारा होता. इस्पितळात महाडिक समर्थकांची संख्या वाढू लागल्यावर तसा तणावही वाढत गेला. पाचगावातही असेच चित्र होते. या दोन्ही ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी दाखल झाले. हल्ला कशाप्रकारे झाला त्याची माहिती परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांकडून घेतली. अॅक्सीस बँकेच्या एटीएमजवळ सी.सी. टीव्ही लावण्यात आला आहे. त्याच्याआधारे हल्लेखोर कोण होते याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू होता.

First Published on February 13, 2013 9:15 am

Web Title: former sarpanch of panchgaon murdered
टॅग Criem