थंडीने गारठून गेलेल्या नागरिकांना सोमवारी रात्री रिमझिम पडलेल्या पावसाने सुखद धक्का दिला. एमआयडीसी परिसरातील मानपाडा पोलीस ठाणे, नंदी हॉटेल. चोळेगाव भागात रस्त्यावर तर चक्क हिरव्या पोगोळ्या पडल्याचे दिसून येत होते. त्यामुळे हा ‘हिरवा पाऊस’ पाहण्यासाठी या भागात नागरिकांनी गर्दी केली होती. वाहनचालक हा थर पाहण्यासाठी थांबत होते. पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. रसायन क्षेत्रातील एका तज्ज्ञाने सांगितले, कॉपर किंवा मोरचूद या रासायनिक घटकांमधून हिरवा रंग बाहेर पडतो. या भागातील एखाद्या कंपनीतून तो बाहेर सोडल्यानंतर हवेतील धुके, पाऊस आणि सूर्यप्रकाश नसल्याने हे रासायिक घटक एकाच जागी कोंडून राहिले. पाऊस सुरू झाल्यामुळे हे घटक जमिनीवर आले असण्याची शक्यता या तज्ज्ञाने वर्तविली.
ढगाळ वातावरणामुळे अकरा वाजेपर्यंत नागरिकांना सूर्यदर्शन झाले नाही. त्यात पावसाची टपटप सुरू होती. बाजारपेठ परिसरात पाऊस, छत्र्यांमुळे पावसाचे वातावरण असल्याचे चित्र दिसत होते. अंबरनाथ, बदलापूरमध्येही पावसाने हजेरी लावली. दाट धुक्यामुळे या परिसरात वाहनचालकांना मार्ग काढणे कठीण जात होते.