इचलकरंजी येथे झालेल्या होडींच्या शर्यतीत सांगली जिल्ह्य़ातील कवठेसार येथील युवाशक्ती बोटक्लबने प्रथम क्रमांक पटकाविला. या संघाला चांदीची गदा, रोख रक्कम व स्मृतिचिन्ह बक्षीस देण्यात आले. स्पर्धेत कोल्हापूर व सांगली जिल्ह्य़ातील १० होडय़ांचा समावेश होता. शर्यत पाहण्यासाठी शौकिनांनी नदीकिनारी मोठय़ा प्रमाणात उपस्थिती लावली होती.    
इचलकरंजी शेतकरी तरूण बेंदुर उत्सव मंडळाच्या वतीने होडय़ांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष फुलचंद चौगुले, बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शर्यतीचा प्रारंभ झाला. स्पर्धेतील १० होडय़ांनी धिम्यागतीने प्रारंभ केला होता. फेरीनिहाय होडय़ा मागेपुढे होत राहिल्याने मोठी चुरस झाली होती. पूर्वेकडे वाहणाऱ्या पाण्याला गती असल्याने त्या बाजूने जाणाऱ्या होडय़ा गतीने मार्गक्रमण करीत होत्या. तर उलट बाजूने येतांना प्रवाहाविरुध्द होडी वलव्हावी लागत असल्याने खेळाडूंची चांगलीच दमछाक होत होती.   शर्यतीच्या अंतिम टप्प्यात कवठेसारची युवाशक्ती बोट क्लब, सांगली जिल्ह्य़ातीलच समडोळीची आझादजनसेवा बोट क्लब आणि इचलकरंजी बोट क्लब यांच्यात जोरदार चुरस निर्माण झाली. अखेर युवाशक्तीने बाजी मारत सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. आझाद जनसेवा व्दितीय तर इचलकरंजी बोटक्लबने तृतीय क्रमांक पटकाविला. समडोळीच्या शानदार बोट क्लबला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. स्पर्धा पाहण्यासाठी पंचगंगा नदीवरील जुन्या व नव्या पुलावर तसेच नदी किनारी हजारो शौकिनांची गर्दी झाली होती.    
विजेत्या संघांना बेंदुर समितीचे अध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, अशोक सौंदत्तीकर, ईलाही कलावंत, बाळासाहेब कलागते, राजेंद्र बचाटे, संजय केंगार, पापा मुजावर, प्रकाश दत्तवाडे यांच्या उपस्थितीत बक्षीस देण्यात आले.