राजकीय व्यक्तीमुळे एखाद्या गावाचा विकास होणे यात विशेष असे काहीच नाही. परंतु क्रीडापटूमुळे एखाद्या गावातील समस्यांची दखल शासनाला घेणे भाग पडणे, त्या गावात कोणत्या विकास कामांना प्राधान्य देण्यात येईल, त्यासंदर्भात प्राथमिक स्वरूपाचा आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरू करावी लागणे हे सर्व काही निश्चितच विशेष. ही सर्व विशेष किमया तालुक्यातील गणेशगाव या गावात होणार असून त्यासाठी कारणीभूत ठरली आहे ती ‘सुवर्णकन्या’ अंजना ढवळू ठमके.
चीनमधील आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत ८०० मीटर धावण्यात अंजनाने सुवर्ण मिळविल्यानंतर ज्याप्रमाणे तिचे दिवस बदलण्यास सुरूवात झाली. त्याप्रमाणे गणेशगावचेही दिवस आता लवकरच बदलणार आहेत. याआधी ज्या ओबडधोबड रस्त्यांवरून धावतच अंजना शाळा गाठत होती, ते रस्तेही कात टाकणार आहेत. नाशिकपासून ३० किलोमीटरवरील अंजनाच्या या गावची लोकसंख्या सुमारे १७००. त्यापैकी बहुतांश लोकसंख्या महादेव कोळी या अनुसूचित जमाती गटातंर्गत येणाऱ्या समाजाची आहे. विकास कामांपासून वंचित असलेल्या गणेशगाव व परिसरातील रस्त्यांची अवस्था बिकट. खुद्द गणेशगावही विविध समस्यांच्या गर्तेत आहे. गणेशगाव ते शिवणगाव या दोन गावांमध्ये दीड किलोमीटरचे अंतर. दोन्ही गावांना जोडणारा हा रस्ता निव्वळ मातीचा. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्याने जाणे म्हणजे एक दिव्यच. यांसारख्या परिसरातील रस्त्यांच्या दुरूस्तीची कामे आदिवासी उपयोजनेतून किंवा ठक्करबाप्पा वस्ती सुधारणा योजनेतून करण्याचे नियोजन आता आदिवासी विकास विभागाकडून करण्यात येणार आहे. तसेच गणेशगावापर्यंत जाणाऱ्या महिरावणीपासूनच्या रस्त्याची अवस्थाही बिकट असल्याने त्याची दुरूस्ती करण्यासाठी आदिवासी विकासाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागास कळविण्यात येणार आहे.
आदिवासी कल्याण मंत्री मधुकर पिचड यांना अंजनाच्या घरची परिस्थिती आणि किती कष्टपूर्वक तिने आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली, याचा वृत्तान्त कळल्यानंतर त्यांनी जाणीवपूर्वक या प्रकरणाकडे लक्ष दिले. अंजनाचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने गौरव करण्याचे निश्चित झाल्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन सप्टेंबर रोजी थेट गणेशगावातील अंजनाच्या घरी धाव घेऊन सर्व माहिती जाणून घेतली. त्यानंतर अंजनाला कशा प्रकारे मदत करता येणे शक्य आहे, परिसरात कोणत्या विकास कामांची गरज आहे, याचा आराखडा तयार करण्यात आला.
अंजनाचे घर गणेशगावपासून शेतात सुमारे ५०० मीटरवर आहे. कच्च्या विटा व मातीचे, गवत व सिमेंटच्या पत्र्यांचे छप्पर असे घराचे स्वरूप. घराच्या भिंती पावसामुळे ओल्या होऊ नयेत यासाठी चारही बाजूंनी कुंपण घालण्यात आले आहे. घराची ही अवस्था पाहून या कुटूंबास घरकुल योजनेतून घर बांधून देण्याची कार्यवाही आता सुरू करण्यात येणार आहे. याआधीच आ. वसंत गिते यांनीही अंजनाला घर बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे.
ढवळू ठमके यांची दीड एकर शेती असली तरी पैशांअभावी त्यांना आजपर्यंत सिंचनाची कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. हे लक्षात घेऊन त्यांना साडेसात अश्वशक्तीचा तेल पंप तसेच २२५ पाईप देण्याचा मुद्दाही आराखडय़ात मांडण्यात आला आहे.
गणेशगावात पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने पिण्याचे पाणी आणण्यासाठी महिलांना दूरवर भटकंती करावी लागते. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेचे काम तत्काळ पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. या मागणीचाही गांभिर्याने विचार करण्यात आला असून संबंधित खात्यास त्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. याप्रमाणे सर्व कामांची अंमलबजावणी झाल्यास भविष्यात गणेशगाव ‘अंजनगाव’ म्हणूनही ओळखले जाऊ शकेल.