आपल्या लाडक्या शिक्षकांना वंदन करण्यासाठी हातात गुलाबपुष्प घेऊन निघालेले शाळकरी विद्यार्थी, आदल्या दिवसापासून महाविद्यालयीन तरुणांकडून सुरू झालेले मानवंदनेचे लघुसंदेश, मंदिरांमध्ये नतमस्तक झालेले भाविक आणि रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी चाललेले गुरुपूजन, प्रवचन, कीर्तन, ध्यान भजन, महाप्रसाद.. अशा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करत सोमवारी उत्तर महाराष्ट्रात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
गुरुजनांप्रती आपला आदरभाव व्यक्त करण्यासाठी बच्चे कंपनीने आदल्या दिवशीच तयारी करून ठेवली होती. यामुळे जेव्हा सोमवारी शाळेत जाण्याची वेळ झाली, तेव्हा बहुतेकांकडे गुलाबाची फुले व अन्य भेटवस्तू दिसत होत्या. फुल विक्रेत्यांनी या दिवसाचे महत्त्व ओळखले होते. त्यामुळे शाळा व महाविद्यालयांबाहेर विक्रेत्यांनी गुलाबपुष्प विक्रीची व्यवस्था केली. अनेक शाळांमध्ये विद्यार्थिनींनी आकर्षक रांगोळ्या काढून गुरुजनांच्या स्वागताची तयारी केली. काही शाळांमध्ये गुरू-शिष्य परंपरेतील गोष्टींचे नाटय़ सादरीकरण करण्यात आले.
‘गुरूने दिला ज्ञानरूपी वसा’ हे समूहगीत विद्यार्थ्यांनी सादर केले. सीडीओ मेरी हायस्कूलमध्ये सोनाली चिंचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूची महती सांगणारी नाटिका सादर करण्यात आली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांसमोर नतमस्तक होत कृतज्ञता व्यक्त केली. गुरुप्रती आदर व्यक्त करताना तरुणाईची भिस्त प्रामुख्याने भ्रमणध्वनीवरील लघुसंदेशांवर राहिली. आदल्या दिवसापासून आवडत्या प्राध्यापकांना कुणी लघुसंदेश करत होते, तर कुणी थेट भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कृतज्ञता व्यक्त करताना दिसले.
विविध संस्था व संघटनांनी खास कार्यक्रमांचे आयोजन केले. आयुर्वेद सेवा संघातर्फे आयोजित सोहळा गणेशवाडीतील आयुर्वेद महाविद्यालयात तर योग वेदांत सेवा समितीच्यावतीने आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव आसाराम बापू आश्रमात झाला. विश्व जागृती मिशनच्यावतीने ऋणानुबंध मंगल कार्यालयात, सनातन भारतीय संस्कृती संस्थेतर्फे प्रसाद मंगल कार्यालय तर सावन रूहानी मिशन नाशिक शाखा संस्थेतर्फे म्हसरूळ येथे गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन केले होते. स्वामी समर्थ केंद्रात अखंड जप, होम हवन, गुरुचरित्राचे पारायण असे धार्मिक कार्यक्रम झाले. शहरी भागांप्रमाणे ग्रामीण भागांतही हा उत्सव उत्साहात साजरा झाला. मनमाडमध्ये यानिमित्त गुरुपूजन, होमहवन, भजन, महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले.