हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले
मृगाची पहिली सलामी दिल्यानंतर काहीशा रूसलेल्या पावसाने सोमवार सकाळपासून नाशिक शहर व जिल्ह्याच्या अनेक भागात संततधार धरली. दुपारी तीन वाजेपर्यंत ही संततधार सुरू होती. जिल्ह्यातील धरणे भरण्यासाठी या पावसाचा फारसा उपयोग नसला तरी शेतीसाठी हा पाऊस चांगला मानला जात आहे. धुळे जिल्ह्यातही पावसाचे प्रमाण काही भागात अधिक तर काही भागात अत्यंत कमी असे आहे. तापी नदीला बऱ्यापैकी पाणी आल्याने सारंगखेडा व प्रकाशा या ठिकाणच्या बॅरेजमधून पाणी सोडण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला असून हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणाचे ३६ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी या तालुक्यांचा अपवाद वगळता इतरत्र चार-पाच दिवसांपासून पाऊस अत्यंत कमी झाला होता. दररोजच्या ढगाळ हवामानामुळे आरोग्यावर तसेच शेतातील उभ्या पिकांवर प्रतिकूल परिणाम होऊ लागला होता. सोमवारी सकाळपासून मात्र पावसाला बऱ्यापैकी सुरूवात झाली. अधूनमधून जोरदार सरींसह संततधार सुरू होती. धरणांमधील जलसाटय़ात अद्याप विशेष वाढ झालेली नाही. धुळे जिल्ह्यातही तीन मध्यम प्रकल्प अजूनही कोरडे आहेत. तर तापी नदीवरील अनेर, सुलवाडे, प्रकाशा आणि सारंगखेडा या चार बॅरेजमधून लाखो क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शिरपूर तालुक्यातील काही भागात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने प्रकल्पांमधील पाण्याच्या पातळीत काहीशी वाढ झाली आहे. जिल्ह्यांमधील आठ पैकी तीन मध्यम प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढली आहे. मालनगाव, कानोली आणि सोनवद प्रकल्प कोरडे आहेत. पांझरा प्रकल्पात १.०५, जामखेडी ०.५, बुराई ३.७५, करवंद १४.८१, अनेर १४.५७ दशलक्ष घनमीटर असा जलसाठा या प्रकल्पांमध्ये झाला आहे. अनेर प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून एक हजार ७० क्युसेस तर सुलवाडे प्रकल्पाच्या २५ दरवाजांमधून एक लाख ७० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.
 सारंगखेडा बॅरेजमधून एक लाख तीन हजार ८६१ तर प्रकाशा बॅरेजमधून एक लाख १३ हजार ८९० क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. सारंगखेडा बॅरेजचे २६ तर प्रकाशा बॅरेजचे २७ दरवाजे उघडे करण्यात आले आहेत.
नाशिक व धुळ्यापेक्षा जळगाव जिल्ह्यात पावसाची स्थिती समाधानकारक आहे. जिल्ह्यात शुक्रवारपासून चांगला पाऊस होत असून हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणाचे ३६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. वाघूर धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याने जळगाव आणि जामनेर या शहरांवरील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे संकट तूर्तास टळले आहे.
रावेर तालुक्यात तसेच तापी नदीच्या उगमस्थानी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पूर्णा व तापी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. जामनेर तालुक्यातील वाघूर व कांग नदीला पूर आल्यामुळे वाघूर धरणाच्या पाणी पातळीत सुमारे एक मीटरने वाढ झाली आहे. जळगावसाठी वाघूर धरणातील मृत जलसाठा घेण्याची विशेष योजना मागील महिन्यात कार्यान्वित करण्यात आली होती. त्यामुळे टंचाईतही शहराला दोन दिवसाआड पाणी पुरवठा सुरू होता. तथापि, पाण्याची खालावत चाललेली पातळी पाहता शहराला तीन दिवसानंतर पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र समाधानकारक पाऊस व वाघूर धरणातील जलसाठय़ात झालेली वाढ पाहता महापालिकेने दोन दिवस आड पाणी पुरवठा होणार असल्याचे जाहीर केले आहे.