केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर कारखानदारी अडचणीत आलेली असताना कारखानदारांनी शहाणपणाने वागावे, असा शरद पवारांनी दिलेला सल्ला स्वत:लाच दिल्यासारखा आहे. कारखाने त्यांचेच सरकार व चुकाही त्यांच्याच आणि सल्लेही पुन्हा त्यांनीच द्यायचे? स्वत:च्या सरकारने काढलेला अध्यादेश फाडून टाकण्याची राहुल गांधी यांची भाषाही अशीच आहे. चुकीच्या धोरणांनी सरकारने लोकांचा विश्वास गमावल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर स्वत:ची प्रतिमा उजळ करण्यासाठी पवार व राहुल हीरोगिरी करत असल्याचा टोला खासदार गोपीनाथ मुंडे यांनी लगावला.
बीड येथे रविवार, २९ सप्टेंबर रोजी भाजपचे लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी प्रसारमाध्यमांच्या निवडक प्रतिनिधींशी बोलताना शरद पवार व राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. मुंडे म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. कच्ची साखर आयात करण्यास सरकारने परवानगी दिल्यामुळे साखरेचे भाव कोसळले. परिणामी, कारखान्यांना आíथक फटका बसल्याने अडोतीस कारखाने अडचणीत आले. अशीच परिस्थिती राहिली तर शंभर कारखाने आजारी पडतील. मात्र, शरद पवार आत्ता कारखानदारांनी शहाणपणाने वागावे, असा सल्ला देत आहेत. सरकार त्यांच्याच पक्षाचे. प्रधानमंत्री त्यांना विचारल्याशिवाय निर्णय घेत नाहीत, हे सर्वानाच माहीत आहे. दहा वर्षे सत्ता उपभोगली तरीही लोकांचे प्रश्न कळाले नाही. सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे आपली प्रतिमा उजळून घेण्यासाठी निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार व राहुल गांधी हीरोगिरी करत आहेत, असे मुंडे म्हणाले.