रविवारच्या सुट्टीची पर्वणी साधत नगरकरांनी ‘साईज्योती स्वयंसहायता यात्रा-२०१४’ या महिला बचतगट उत्पादनांच्या प्रदर्शनास अलोट गर्दी केली. त्यामुळे रात्री प्रदर्शनाची वेळही वाढवून साडेअकरा करावी लागली. गर्दीमुळे प्रदर्शनातील उत्पादनाच्या उलाढालीतही मोठी वाढ झाली. आज पाचव्या दिवसाअखेर एकूण विक्री सुमारे पावणेदोन कोटी रुपयांवर गेली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने नाशिक विभागातील पाच जिल्हय़ांतील महिला बचतगटांच्या उत्पादनांचे विक्री प्रदर्शन सावेडीतील जॉगिंग पार्क मैदानावर आयोजित केले आहे. प्रदर्शन आणखी दोन दिवस, मंगळवापर्यंत आहे, मात्र रविवारमुळे नगरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे अनेक गटांना पुन्हा मालाची आपल्या गावाकडे मागणी करावी लागली. स्वयंसहायता गट आपल्या विक्रीचे आकडे सांगत नव्हते, परंतु प्रदर्शनातील गटांच्या रोजच्या भरण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांची मदत घ्यावी लागली.
आज जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे, जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, सभापती हर्षदा काकडे, सभापती शाहुराव घुटे आदींनी प्रदर्शनात हजेरी लावत खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला तसेच गटांची व्यवस्था, प्रदर्शनाचे नियोजन याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रदर्शनात राज्याच्या ग्रामीण भागातील सुमारे ४० ते ५० खाद्यपदार्थ आहेत. शिंगोरी आमटी, शिपी आमटी, खलण्याचे भाकरी-भरीत, मासवडी, हुरडय़ाचे थालपीठ, मांडे, पुरणपोळी यावर खवय्यांच्या उडय़ा पडल्या होत्या. सुरक्षेच्या दृष्टीने विविध गॅस कंपन्यांच्या एजन्सींच्या कर्मचाऱ्यांनी स्टॉलमधील गॅस शेगडीची तांत्रिक तपासणी करून दिली. सहभागी गटांच्या महिला सभासदांच्या कॅल्शिअमच्या प्रमाणाचीही आज सवलतीच्या दरात तपासणी करण्यात आली.
‘झेप मराठी कलेची’ या नगरमधील कलाकारांनी महाराष्ट्राच्या परंपरेवर आधारित नृत्याविष्कार सादर करत नगरकरांचे मनोरंजन केले. नगरकरांनी उर्वरित दोन दिवस असाच प्रदर्शनास प्रतिसाद देऊन ग्रामीण महिलांच्या व्यावसायिक कलागुणांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे व उपाध्यक्ष मोनिका राजळे यांनी केले.