पक्षाने आदेश दिला तर लोकसभेसाठी मैदानात उतरण्याची तयारी भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रकाश शेंडगे यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दर्शविली. जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी असणारा ३५ कोटीचा निधी सत्ताधारी मंडळींनी तासगाव, कवठेमहांकाळकडे वळविल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.
    भाजपने या वेळी लोकसभेची निवडणूक कोणत्याही स्थितीत पक्षाच्या चिन्हावरच लढविली जावी अशी पक्ष कार्यकर्त्यांची भूमिका असून पक्षश्रेष्ठींचाही तसाच आग्रह असल्याचे सांगत आ. शेंडगे म्हणाले, की पक्षाने आदेश दिल्यास लोकसभेसाठी मदानात उतरण्याची तयारी आहे. मात्र तत्पूर्वी कार्यकर्त्यांशी आपणाला चर्चा करावी लागेल यासंदर्भातला अंतिम निर्णय अद्याप झाला नसला तरी पुढील आठवडय़ापर्यंत पक्षाची भूमिका स्पष्ट होईल.
    दुष्काळी भागाचा आतापर्यंत केवळ राजकारणासाठीच वापर केला गेला. म्हैसाळचे पाणी जत तालुक्याला उपलब्ध व्हावे यासाठी तरतूद करण्यात आलेला ३५ कोटींचा निधी तासगांव, कवठेमहांकाळकडे वळविण्यात आला. असा आरोप करून ते म्हणाले, की महाराष्ट्र, कर्नाटक सीमेवरील ६४ गावांसाठी पाणी योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.  हे पाणी नसíगक उताराने वाहात असल्याने खर्चही कमी येणार आहे.  कृष्णा पाणीतंटा लवादाने उपलब्ध करून दिलेल्या अतिरिक्त पाण्यापकी ७ टीएमसी पाणी जतच्या दुष्काळी भागाला दिले तर ३२ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल असेही त्यांनी सांगितले.