उरण-पनवेल राज्य महामार्ग क्रमांक ५४ वरील दास्तान ते गव्हाणफाटादरम्यानच्या रस्त्याच्या कडेला दोन-दोन रांगा करून अवजड कंटेनर वाहनांची पार्किंगहोत असल्याने या मार्गावरील वाहनांना ये-जा करण्यासाठी अडथळ निर्माण होत आहे. यामुळे अपघाताचेही प्रमाण वाढल्याने रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे उभ्या करण्यात येणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी उरणमधील नागरिकांनी राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. महामार्गाचे उरण (जेएनपीटी) ते आम्रमार्ग (नवी मुंबई) असे चौपदरीकरण करण्यात आले आहे. मात्र या मार्गावरील जेएनपीटी बंदरावर आधारित उद्योगातील वाहनांच्या संख्येत हजारोंनी वाढ होत असल्याने चारपदरी रस्ताही वाहतुकीसाठी कमी पडू लागला आहे. त्यामुळे हा मार्ग आठपदरी करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र सध्या या महामार्गाचे रुंदीकरण होऊनही दास्तानफाटा ते गव्हाण फाटादरम्यानच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जेएनपीटी बंदरावरील उद्योगातील तसेच गोदामातील मालाची ने-आण करणारी हजारो अवजड वाहने काही ठिकाणी एक रांग, तर काही ठिकाणी दोन रांगा लावून अनधिकृतपणे उभी केली जात आहेत. त्यामुळे चारपदरी असलेल्या रस्त्याची गल्ली झाली आहे. परिणामी, या मार्गावरील वाहनांना ओव्हरटेक करताना अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच या परिसरातील उरण-पनवेल रस्त्यालगत असणारी बेकायदा गोदामे व कंटेनर यार्ड्समुळेदेखील वाहतूककोंडीच्या समस्येत भर पडत आहे.