सांगली संस्थानच्या गणपतीचे शुक्रवारी झांजपथक, बॅन्डच्या निनादात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात विसर्जन  झाले. पारंपरिक वेशभूषेसह संस्थानी गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक निघाली होती. दरबार हॉलपासून निघालेल्या या मिरवणुकीत संस्थानिक विजयसिंहराजे पटर्वधन यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. संस्थानी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी ग्रामीण भागातील हजारो गणेशभक्त सांगलीत दाखल झाले होते.
गणेशदुर्गमधील दरबार हॉलमध्ये उत्सवी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. दुपारी विजयसिंहराजे पटवर्धन आणि राजलक्ष्मी पटवर्धन यांच्या उपस्थितीत आरती झाल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला. राजवाडा चौक,पटेल चौक, गणपती पेठ, गणेश मंदिर, टिळक स्मारक मंदिर या मार्गावरुन विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील, महापौर श्रीमती कांचन कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील (मजलेकर), माजी आ. नितीन िशदे आदींसह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
झांजपथक,टाळमृदंग यांच्याबरोबरच गंधर्व ब्रॉस बॅन्ड कंपनी हे मिरवणुकीच्या पुढे होते. मिरवणुकीत सजवलेल्या घोडय़ांचा समावेश करण्यात आला होता. याशिवाय मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी संस्कार भारती रांगोळीचे रेखाटन केले होते. सराफ बाजार कॉर्नर येथे भव्यदिव्य रांगोळी गणेश भक्तांचे आकर्षण ठरली होती. सायंकाळी मावळत्या सूर्यकिरणांच्या साक्षीने आरतीनंतर ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात सरकारी घाटावर श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.  
दरम्यान, मिरजेतही पटवर्धन संस्थानिकांच्या पुढाकाराने बऱ्याच वर्षांच्या खंडानंतर सुरु झालेल्या गणेशोत्सवाची शुक्रवारी श्रींच्या विसर्जनानंतर सांगता झाली. मिरजेतही यंदा शाही विसर्जन मिरवणूक पाहण्याची संधी गणेशभक्तांना लाभली. ऐतिहासिक गणेश मंदिरात श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
मिरजेतील विसर्जन मिरवणूक शनी मारुती मंदिर, नागोबा कट्टा, लक्ष्मी मार्केट,दत्त मदान ते परत श्रीकांत चौक,गणेश तलाव या मार्गावर काढण्यात आली. या मिरवणुकीत बाळासाहेब पटवर्धन,गोपाळराजे पटवर्धन,आ. सुरेश खाडे, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार, नगरसेवक सुरेश आवटी, व्यापारी असोसिएशनचे गजेंद्र कल्लोळी आदींसह अनेक कार्यकत्रे सहभागी झाले होते.