महापौर आणि उपमहापौरपदासाठी काँग्रेस आघाडीतून ठरल्यानुसार प्रत्येकी एकाचाच उमेदवारी अर्ज दाखल झाला. भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीत मात्र दोन्ही पदांसाठी दोन्ही पक्षांनी प्रत्येकी एकाचा अर्ज दाखल करून संभ्रम निर्माण केला आहे.
महापौर आणि उपमहापौरपदासाठी येत्या दि. ३० ला निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. दि. ३०ला बोलावण्यात आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्याच सभेत या निवडी होणार असून सभेतच अर्ज मागे घेता येतील.
 काँग्रेस आघाडीत महापौरपद राष्ट्रवादीला आणि उपमहापौरपद काँग्रेसला गेले आहे. त्यानुसार महापौरपदासाठी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर संग्राम जगताप व उपमहापौरपदासाठी सुवर्णा संदीप कोतकर यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.
शिवसेना-भाजप युतीने मात्र दोन्ही पदांसाठी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महापौरपदासाठी अनिल शिंदे (शिवसेना) व बाबासाहेब वाकळे (भाजप) यांनी तर उपमहापौरपदासाठी दीपाली बारस्कर (शिवसेना) व बाबासाहेब वाकळे (भाजप) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपने महापौर व उपमहापौर अशा दोन्ही पदांसाठी वाकळे यांचेच उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपने त्यांच्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवानाही केल्याचे समजते.
मनपातील नवे संख्याबळ लक्षात घेता काँग्रेस आघाडीला फारशी अडचण येऊ नये अशीच राजकीय स्थिती आहे. काँग्रेस आघाडीचे २९ सदस्य (राष्ट्रवादी १८, काँग्रेस ११) आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीने अन्य अपक्षांच्या मदतीने हे संख्याबळ ३७ ते ३८ पर्यंत वाढवले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ४ सदस्यांसह हे संख्याबळ ४१ ते ४२ पर्यंत जाईल असा दावा राष्ट्रवादीच्या गोटातून केला जात आहे. युतीकडे मात्र एका अपक्षासह (सचिन जाधव- शिवसेना) २७ सदस्य आहेत. बहुमतासाठी ३५ सदस्यांची आवश्यकता आहे. हे संख्याबळ काँग्रेस आघाडीने गाठले असले तरी यात संभ्रम निर्माण करण्याचा भाजप-शिवसेना युतीचा प्रयत्न आहे. शिवाय सत्ता मिळो न मिळो त्या ईष्र्येने निवडणूक लढवल्याशिवाय आहे ते सैन्यही स्थिर राहणार नाही, या शक्यतेनेही भाजप-शिवसेना युतीत महपौर-उपमहापौरपदासाठी मोर्चेबांधणी सुरू असल्याचे समजते.