शिक्षण व उद्योग यांच्या समन्वयातून विद्यार्थी आणि समाजासाठी काही उपक्रम राबवावेत या उद्देशाने अंबरनाथ येथील पी. डी. कारखानीस महाविद्यालयात अलीकडेच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे कार्यवाह श्रीकांत देशपांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाटवे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
भारतात सर्व स्तरातील मुलांमध्ये गुणवत्ता आहे. या गुणवत्तेचा उपयोग देशाला होणे आवश्यक आहे. परंतु सध्या आपल्या गुणवत्तेचा उपयोग इतर देश घेत आहेत, असे त्यांनी सांगितले. परदेशात भारतीयांच्या गुणवत्तेला फार मोठे महत्व आहे. देशातील नागरिक गुणवत्तेच्या जोरावर देशाला पुढे नेऊ शकतात, यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि एकत्र येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात स्पेशालिटी केमिकल्सचे प्रवीण हेर्लेकर, थर्मेक्सचे संजय पावसे आणि विश्वास धोंगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अणेकर यांनी केले.