सोलापुरातील प्रसिध्द समुपदेशिका अलका काकडे यांच्या समुपदेशनाच्या कार्याला ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल उद्या सोमवारी, ३ फेब्रुवारी रोजी त्रिदशकपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ सिने-नाटय़ अभिनेते तथा मानसोपचार तज्ज्ञ डॉ.मोहन आगाशे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘जीवनसमृध्दी’ समुपदेशन केंद्राचा शुभारंभही होणार आहे.
विद्या व्यवसाय मार्गदर्शन केंद्र तसेच आत्मविकास व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा. का. किलरेस्कर सभागृहात सायंकाळी सहा वाजता आयोजिलेल्या या कार्यक्रमाची माहिती अलका काकडे यांनी दिली. त्यांच्या समुपदेशनाच्या त्रिदशकपूर्तीचे औचित्य साधून ‘जीवनसमृध्दी’ या नव्या मल्टिस्पेशालिटी समुपदेशन केंद्राचा शुभारंभ होणार आहे. या नव्या समुपदेशन केंद्रामार्फत व्हेंटिलेशन थेरपी, प्ले थेरपी, फिल्म थेरपी, शिल्पकला थेरपी, डान्स थेरपी, म्युझिक थेरपी यांसारख्या विविध थेरपींचा वापर करून समुपदेशन केले जाणार असल्याचे अलका काकडे यांनी सांगितले. या समारंभाचे अध्यक्षस्थान अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. माधवी रायते भूषविणार आहेत.