करमाळा नगरपरिषदेच्या अध्यक्षा पुष्पा फंड यांनी आपला राजीनामा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे सुपूर्द केला असून जिल्हाधिकाऱ्यांनी हा राजीनामा मंजूर केला आहे.
नगराध्यक्षा पुष्पा फंड यांना कायद्याने अडीच वर्षांचा कालावधी मिळाला होता. परंतु एक वर्षांचा कालावधी झाल्यानंतर सत्ताधारी गटात इतरांनाही संधी द्यावी अशी मागणी जोर धरल्याने अखेर फंड यांना राजीनामा देणे भाग पडले. करमाळा नगरपरिषदेवर काँग्रेसचे माजी आमदार जयवंत जगताप यांचे अबाधित वर्चस्व आहे. त्यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्ष पुष्पा फंड यांनी पदाचा राजीनामा देऊन आपली खुर्ची इतरांसाठी मोकळी केली आहे. नगराध्यक्षपद हे खुल्या महिलेसाठी राखीव असून फंड यांचे उत्तराधिकारी म्हणून विद्या चिवटे, जया इंदुरे, प्रमिला जाधव आदींची नावे चर्चेत आहेत. जयवंत जगताप हे कोणाच्या बाजूने झुकते माप टाकतात, यावर नगराध्यक्षपदाची संधी अवलंबून आहे.