समाधीपूजन, कार्यकर्त्यांनी गावागावांतून प्रेरणा ज्योतीसह सद्भावना दौडने येऊन वाहिलेली आदरांजली आणि विविध उपक्रमांनी येथील श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूहाचे संस्थापक तात्यासाहेब कोरे यांचा स्मृतिदिन संपन्न झाला.
सहकार रत्न तात्यासाहेब कोरे यांच्या १८ व्या स्मृतिदिनी वारणा समूहाचेअध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्या हस्ते समाधीचे विधिवत पूजन झाल्यानंतर वारणा समूहातील संस्थांचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी फुलांनी आकर्षकरित्या सजविलेल्या समाधीस्थळी येऊन श्रध्दांजली वाहिली. वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूहाचे संस्थापक सहकाररत्न तात्यासाहेब कोरे यांच्या १८ व्या स्मृतिदिनी आज पहाटेपासूनच गावागावांतून कार्यकर्त्यांनी घेऊन आलेल्या प्रेरणा ज्योतीचे आमदार विनय कोरे यांनी स्वागत केले. तेथून घोषणा देत कार्यकर्ते सद्भावना दौडीतून समाधीस्थळी आले.
यावेळच्या दिंडीमध्ये पालखीसह वारकरी, वारणा विद्यालयाच्या मुलींचे झांजपथक, भजनी पथक व कार्यकर्ते मोठय़ासंख्येने सहभागी झाले होते. समाधीस्थळी मुख्य ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. बहिरेवाडी व केखले येथील भजनी मंडळांनी व वारकऱ्यांनी पालखीतून तात्यासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून वारणा शेतकरी कार्यालयातील दर्शनी दालनात भजन सादर केले.
तसेच समाधीस्थळी वारणा भगिनी मंडळाने व दीपक झावरे यांनी भजनगीते सादर केली. या वेळी महात्मा गांधी मेडिकल ट्रस्टचे डॉ.सुधाकर कोरे, वारणा बझार समूहाच्या अध्यक्षा शोभाताई कोरे, निपुण कोरे, स्नेहा कोरे, शुभलक्ष्मी कोरे, वारणा समूहातील संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी व गावागावांतून आलेले कार्यकर्ते यांनी तात्यासाहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. तसेच त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यस्मृतीस उजाळा दिला.