इतर गावांनी आदर्श घ्यावा- आमदार उत्तम ढिकले
सर्व जाती-धर्मामध्ये एकोपा साधत संस्कृती जपण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करणाऱ्या आणि दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या मखमलाबादचा आदर्श इतर सर्व गावांनी घ्यावा, असे आवाहन आ. उत्तमराव ढिकले यांनी केले आहे.
मखमलाबाद येथील कै. शरद पिंगळे विचार मंचचे संस्थापक दत्तात्रय पिंगळे व सहकाऱ्यांनी ५० क्विंटल धान्य गोळा करून नांदगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना केले. तसेच गावातील शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते अतुल फडोळ व किरण काकड यांनी स्वत: ४५ गाठी गवत सिन्नर तालुक्यातील मरळ येथील चारा छावणीसाठी पाठविले. ट्रकद्वारे हे गवत पाठविण्यापूर्वी महापालिका आयुक्त संजय खंदारे, आ. उत्तम ढिकले, नगरसेवक दामोदर मानकर, तानाजी पिंगळे, रामचंद्र काकड आदींच्या उपस्थितीत त्याचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी आ. ढिकले यांनी मखमलाबादचे वैशिष्टय़ सांगितले.  कार्यक्रम सुरू असताना सुरेश काकड यांनी दीड एकर मका आणि साधारण १० ट्रक चारा दुष्काळग्रस्त भागासाठी लगेच पाठविणार असल्याचे जाहीर केले. आयुक्त खंदारे, आ. ढिकले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शरद पिंगळे विचार मंचच्या वतीने संस्थापक दत्तात्रय पिंगळे यांनी महापालिका व लोकवर्गणीमधून नाल्यांवर बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्याची घोषणा केली. ग्रामस्थांच्या वतीने तानाजी पिंगळे यांनी सर्वाचे सहकार्य नगरसेवक मानकर यांना देत राहू असे मनोगत व्यक्त केले. वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र काकड यांनी १९७२मध्ये ढिकले यांच्या नेतृत्वाखाली धर्मशाळेत १०० पोती धान्य जमा करून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते दुष्काळग्रस्तांना वाटप करण्यात आले होते, याची आठवण सांगितली. कारभारी शिंदे यांनी ग्रामस्थ चांगल्या कामासाठी यापुढेही एकत्र येत राहतील अशी ग्वाही दिली.
प्रभागामध्ये सार्वजनिक सुविधांचा तुटवडा असल्याचे मानकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. आयुक्तपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून आपण मखमलाबाद येथे दुसऱ्यांदा येत असून या गावातील समस्यांची आपणास जाण असल्याचे त्यांनी सांगितले. शंकर पिंगळे यांनी गावातील समस्या मांडल्या. मखमलाबाद ही नुसती विचारांची नव्हे तर संस्कृतीची खाण आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख आ. ढिकले यांनी केला. मंदिरांची प्राणप्रतिष्ठा असेल, कबड्डी स्पर्धा असो, शिक्षक गौरव समारंभ किंवा विद्यार्थी गुणगौरव सोहळा असो, अखंड हरिनाम सप्ताह, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार असो, ग्रामसुरक्षा दलाची स्थापना, वाचनालयाची व्याख्यानमाला असो या सर्व कार्यक्रमांद्वारे मखमलाबादकर सुसंस्कृतपणा टिकविण्यासाठी प्रयत्नशील असतात, असेही ते म्हणाले. आभार संजय फडोळ यांनी मानले.