तालुक्यातील देवगाव येथील आठ दिवसांच्या बालिकेला बिबटय़ाने पळवून नेल्याचा बनाव अखेर उघड झाला. पहिल्या तीनही मुली असल्याने पुन्हा चौथी मुलगीच झाली, तीही संक्रांतीच्या दिवशीच जन्मली. त्यामुळे जन्मदात्या माता-पित्याने संगनमतानेच छोटय़ा मुलीचा काटा काढला. या माता-पित्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना गुरुवारी अटक करण्यात आली.
सुदाम भिकाजी कोटकर (वय ३२) व उज्ज्वला (३०) असे अटक केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. उज्ज्वलाने आपण प्रातर्विधीसाठी बाहेर गेलो असता मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास बिबटय़ाने बालिकेला पळवून नेले असे उद्वेगाने सांगितले होते. आठ दिवसांची बालिका बिबटय़ाच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सर्वत्र हळहळही व्यक्त करण्यात येत होती. दुस-या दिवशी शोधाशोध करूनही तिचा मृतदेह किंवा शरीराचे अवशेष अथवा रक्ताच्या कोणत्याही खाणाखुणा सापडल्या नाहीत. त्यामुळेच संभ्रम निर्माण झाला असतानाच बुधवारी सकाळी या दाम्पत्याच्या वस्तीजवळच्याच विहिरीत त्या बालिकेचा मृतदेह आढळून आला. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी लोणीला पाठवला होता. त्यावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नसल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी या दाम्पत्याकडे स्वतंत्रपणे चौकशी केली असता दोघांच्याही सांगण्यात विसंगती आढळल्याने हा संशय बळावला. त्यामुळे बुधवारीच या दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी आज अधिक चौकशी केली असता वरील हृदयद्रावक वास्तव समोर आले.
या दाम्पत्याला पहिल्या तीन मुली आहेत. पुन्हा मुलगीच जन्मल्याने नाराज मातापित्याने तिचे जीवन संपवले, विशेष म्हणजे आईनेही त्याला संमती दिली. ठरल्यानुसार पहाटे साडेतीनच्या सुमारास वडिलांनी जिवंत मुलीला विहिरीत फेकून दिले. वस्तीवर मुलीविषयीची चौकशी होईल म्हणून बिबटय़ाने मुलीला पळवून नेल्याचा बनाव रचल्याची कबुली त्यांनी दिल्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी सांगितले. दरम्यान, या दोघांनाही गुरुवारी खुनाच्या गुन्ह्य़ात अटक करण्यात आली असून, उद्या (शुक्रवार) न्यायालयासामोर उभे केले जाणार आहे.