कोकणातील ‘दशावतार’ या कलाप्रकाराची माहिती घेण्यासाठी वेंगुल्र्याला अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या २२ विद्यार्थ्यांसोबत विभागातील कोणतीही वरिष्ठ व जबाबदार व्यक्ती नसल्याने या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला वाऱ्यावर सोडण्यात आल्याची भावना आहे.
अकादमीचे संचालक प्रकाश खांडगे यांनी या दौऱ्याचे नेतृत्व करायला हवे होते. ते स्वत: चिपळूणला साहित्य संमेलनाला गेले होते. या संमेलनात दशावतारासह गवळण, खेळ आदी कोकणातील पारंपरिक लोककलांचे प्रकार सादर केले जाणार होते. वेंगुल्र्याला जाण्याऐवजी साहित्य संमेलनातच विद्यार्थ्यांनी त्यांची माहिती घ्यावी, अशी त्यांची योजना होती. म्हणून त्यांनी मुलांना चिपळूणला बोलावून घेतले. मुले अकादमीतील एका महिला कनिष्ठ कर्मचाऱ्यासोबत संमेलनाच्या ठिकाणी आली. पण, मुले तिथे पोहोचेपर्यंत संमेलनाचे सूप वाजले होते. म्हणून मग दशावतार कलाप्रकाराचे मूळ ज्या ठिकाणी आहे त्या मालवणातील वेंगुर्ले येथे जायचे ठरले. कारण, वेंगुल्र्याला पारंपरिक जत्रेत हे कलाप्रकार सादर होत असतात.ही मुले मुंबईहून खासगी वाहनाने निघाली होती. चिपळूणपर्यंतच्या प्रवासात त्यांच्यासोबत जबाबदार व्यक्ती नव्हती. पण, किमान त्यानंतरच्या प्रवासात तरी खांडगे यांनी विद्यार्थ्यांसोबत जाणे अपेक्षित असताना एका अचानक उद्भवलेल्या बैठकीच्या निमित्ताने त्यांना अभ्यास दौरा अर्धवट टाकून मुंबईला परतावे लागले. मग मुले विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या मदतीने पुढे वेंगुल्र्यापर्यंत गेली. अकादमीतील वरिष्ठ अधिकारी अथवा शिक्षकाने या दौऱ्यात त्यांच्यासोबत राहणे आवश्यक होते. मुंबई ते मालवणपर्यंतचा मोठा प्रवास विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदारीवर करायला लावणे कितपत योग्य ठरते, असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे या २२ विद्यार्थ्यांमध्ये नऊ मुली आहेत.दशावतार विषयाचे अभ्यासक कलावंत आणि अकादमीचे एक अध्यापक (व्हिजिटिंग) तुलसीदास बेहेरे यांनी आपल्या घरी मुलांच्या राहण्याची व्यवस्था केली. या संदर्भात खांडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महत्त्वाच्या बैठकीसाठी विद्यापीठाच्या कुलसचिवांकडून बोलावणे आल्याने आपल्याला अभ्यासदौरा अर्धवट सोडून परतावे लागले, अशी प्रतिक्रिया दिली. वेंगुल्र्यात बेहेरे यांच्याकडे मुलांची जबाबदारी असणार आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. पण, मुंबईला परतताना या विद्यार्थ्यांची जबाबदारी कुणावर असा प्रश्न आहे