मान्यवर साहित्यिक मंगेश पाडगावकर, ना. धों. महानोर, श्री. ना. पेंडसे, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सन्मानित करता आले नाही. ही मोठी खंत असून, त्या दृष्टीने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटनात्मक दुरुस्ती महत्त्वाची आहे आणि ही घटनात्मक दुरुस्ती घडवून आणण्यासाठीच आपण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक, चित्रपट निर्माते व प्राप्तिकर सल्लागार अरूण गोडबोले यांनी सांगितले.
सासवड येथे होणाऱ्या ८७ व्या अखिल भारतील मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीतील अध्यक्षपदासाठी असलेल्या आपल्या उमेदवारीसंदर्भात भूमिका मांडण्यासाठी अरूण गोडबोले यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला.
साहित्य संमेलनात चांगल्या प्रथा निर्माण करण्यासाठीच माझी उमेदवारी असल्याचा विश्वास देऊन, गोडबोले म्हणाले, की उद्या घटनादुरुस्ती होऊन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मान्यवर व स्वाभिमानी साहित्यिकांना उमेदवारी अर्ज करण्याची वेळ येऊ नये अशी माझी रास्त भूमिका आहे. तसे झाल्यास मंगेश पाडगावकर व ना. धों. महानोर यांच्या सारख्या साहित्यिकांचा खऱ्या अर्थाने सन्मान होईल असे त्यांनी ठासून नमूद केले.
सासवड येथे होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत फ. मुं. शिंदे, प्रभा गणोरकर व संजय सोनवणी यांचीही उमेदवारी आहे. परंतु, साहित्य संमेलनाच्या निवडणुकीतील आरोप प्रत्यारोपांना पूर्णत: बगल देण्याचे सामंजस्याने ठरले आहे. मतदारांशी संपर्क साधून निकोप लोकशाही मार्गाने निवडणूक होईल. त्यात जात, धर्म, प्रांत यापेक्षा साहित्यसेवेच्या कर्तृत्वावरच अध्यक्षपदाची निवड अपेक्षित असल्याचे गोडबोले यांनी नमूद केले. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष लोकशाही मार्गानेच निवडला जाण्याचा आग्रह करणारी महामंडळ अध्यक्षपदासाठी मतदार निवडताना मात्र, त्यांची मनमानी चालू असल्याचा आरोप अरूण गोडबोले यांनी केला. प्रत्येक घटक संस्थेत सक्षम सभासद आहेत. मात्र, मतदारयादी तयार करतानाच घटक संस्थेच्या प्रमुखांच्या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्यांना अपवादात्मक सदस्य वगळता मतदानाचा अधिकार दिला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेने मतदार यादी अध्यक्षपदाच्या दावेदारांना सादर करताना दूरध्वनी क्रमांक अथवा भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध होऊ न देण्याची काळजी घेतली आहे. आयुष्याच्या संध्याकाळी साहित्यासाठी योगदान देण्याऐवजी दारोदारी पत्ते हुडकत फिरण्याची वेळ अध्यक्षपदाच्या दावेदारावर आली असल्याची खंत गोडबोले यांनी व्यक्त केली.
गेल्या चार दशकात आपला साहित्य क्षेत्राशी संबंध आहे. १९८२ साली कौशिक प्रकाशन ही संस्था स्थापन करून त्या माध्यमातून १२० पुस्तके व सीडीज प्रकाशित केल्या आहेत. १९६३ च्या सातारा येथील साहित्य संमेलनात वडील रा. ना. तथा बन्या बापू गोडबोले कार्याध्यक्ष होते. त्यात भोजन समिती, स्वयंसेवक म्हणून मी काम केले. आपण स्वत: १९७५ व २००४ मधील कराड येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनाशी निगडित होतो. १९९३ मध्ये साताऱ्यातील ६६ व्या साहित्य संमेलनाचा मी निमंत्रक व कार्यवाह म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. आजवर असंख्य साहित्य उपक्रमांचे आयोजन केले आहे. साहित्य क्षेत्राबरोबर कायम राहताना साहित्य विश्वाशी आपले ऋणानुबंध असल्याने उदात्त भूमिका घेऊन या निवडणूक रिंगणात असल्याचे सांगताना, जनसंपर्क व साहित्य क्षेत्राशी सततचे संबंध यामुळे यश मिळेल असा विश्वास असल्याचे ते म्हणाले. माझ्या ‘अजिंक्यतारा ते आल्प्स’ या उत्कृष्ट प्रवास वर्णनास कै. अनंत काणेकर पुरस्कार, ‘श्री दासबोध नित्यपाठ’ यास महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा गोयंका पुरस्कार, ‘अष्टावक्रगीता निरूपण’ यास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, सांगली जिल्हा नगरवाचनालयाचा संत साहित्य लेखनाबद्दलचा संत रामदास स्वामी पुरस्कार, कै. ना. ह. आपटे स्मृती साहित्यसेवक पुरस्कार असे मानसन्मान मला व माझ्या साहित्य संपदेला प्राप्त झाले आहेत. तसेच, ‘नशीबवान’ या चित्रपटास राज्य शासनाचे सहा पुरस्कार याचबरोबर उत्कृष्ट निर्माता म्हणून पुरस्कार, उत्कृष्ट निर्मिती म्हणून कै. स्मिता पाटील स्मृती प्रेरणा पुरस्कार, ‘रामरहीम’ या चित्रपटास निर्मिती व दिग्दर्शन या दोन्हीची बॉम्बे सिनगोअर्स अॅवॉर्डस्, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडून चित्रकर्मी पुरस्कार मला प्राप्त झाला आहे.