बाळाचा जन्म झाल्याने घरात व नातेवाईकांत आनंदी वातावरण निर्माण झाले असताना बाळाच्या हृदयाचा एक व्हाल्व खराब असल्याची माहिती मिळताच आनंदाचे वातावरण चिंतेत पसरले. या नवजात मुलावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. परंतु आर्थिक टंचाईमुळे या बाळाच्या पित्यापुढे लोकांसमोर हात पसरण्याची पाळी आली आहे.
आंबेडकरनगरतील हेमदेव चौरागडे यांच्या घरी २८ मार्चला बाळाने जन्म घेतला. त्यामुळे कुटुंब व नातेवाईक आनंदी होते. परंतु बाळाच्या हृदयाचा एक व्हाल्व खराब असून त्याच्यावर दोन महिन्यांच्या आत शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. ही माहिती मिळताच कुटुंबातील सर्वाच्याच पाायखालची वाळू सरकली. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी ७ लाख रुपये खर्च येणार आहे.
बाळाचा जीव वाचवण्यासाठी खर्च करणे आवश्यक आहे. यातील साडे तीन लाख रुपये गोळा झाले असले तरी आणखी साडेतीन लाख रुपयांची गरज आहे. कुटुंबातील हा एकमेव मुलगा आहे.
हेमदेव यांच्या कुटुंबात पत्नी, एक मुलगी व आई-वडील आहेत. ते स्वत: एका वृत्त वाहिनीत काम करतात. या बाळावर मुंबईतील एका रुग्णालयात शस्त्रक्रिया केली जाणार आहे. दानशुरांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. दानदाते हेमदेव चौरागडे यांच्याशी ९३७३२२०००२ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.