निसर्गात रमणाऱ्यांसाठी आणि ठिकठिकाणच्या पक्षी व प्राणी अभयारण्य यांना भेट देण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांच्या माहितीसाठी नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे ‘चला फिरायला’ ही दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे.
या दिनदर्शिकेत नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य, सक्कर बाग प्राणीसंग्रहालय, गीर राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बांधवगड राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान, खिजाडिया पक्षी अभयारण्य, नवेगाव बांध, रनथंबोर, ताडोबा, मरीन, वारुदा या राष्ट्रीय उद्यानांची माहिती दिनदर्शिकेत आहे. या उद्यानांमध्ये कोणते प्राणी दिसतात, नाशिकहून संबंधित उद्यानांपर्यंत जाण्याचा मार्ग, निवास व्यवस्था आदी सर्व माहितीही दिनदर्शिकेत आहे. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये या दिनदर्शिकेचे मोफत वाटप केले जाणार आहे. दिनदर्शिकेचे प्रकाशन नागपूर येथे आयोजित २७ व्या पक्षीमित्र संमेलनात वन्य अभ्यासक व लेखक मारुती चितमपल्ली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष भाऊ काटधरे. वन्यजीव अभ्यासक अनिल माळी, पक्षीमित्र भीमराव राजोळे, रवींद्र वामानाचार्य, संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यावेळी उपस्थित होते. चितमपल्ली यांनी असे उपक्रम निसर्ग संवर्धन व जनजागृतीसाठी उपयोगी पडणार असल्याचे सांगितले.
शाळा-महाविद्यालयांनी या दिनदर्शिकेसाठी प्रा. आनंद बोरा ९८२२२८६७५० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.