सभापतींनी केली अचानक पाहणी
कार्यालयास दुपारीच दांडी मारून घर गाठणाऱ्या पंचायत समितीच्या सहा कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत, तर पाच अभियंत्यांना स्वतंत्र नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
सभापती सुदाम पवार यांनी काल सायंकाळी समिती कार्यालयात आल्यानंतर स्वत:च्या दालनात न जाता बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, मागास क्षेत्र अनुदान योजना, लघुपाटबंधारेसह सर्व विभागांना भेटी दिल्या असता काही कर्मचाऱ्यांनी दुपारीस दांडी मारून घर गाठल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संतप्त होत त्यांनी थेट पाटील यांच्याशी संपर्क साधून या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली.
त्यानंतर पाटील यांनी प्रभारी गटविकास अधिकारी दयानंद पवार यांच्याशी संपर्क साधून गैरहजर  असणाऱ्या एन. आय. शेख, एम. एम़ फकीर, सी. डी. चौधरी या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांसह कार्यालयीन अधीक्षक बी. जी. शिर्के, कनिष्ठ सहायकयू. एम. सोनवणे व परिचर व्ही. एल. भिंगारदिवे यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला. अभियंता बी. एन. शिंदे, व्ही. जी. जोशी, आर. एल. नागपुरे, सी. एस. मुळे, ए. व्ही. जगदाळे हे देखील गैरहजर असल्याचे आढळून आले त्यांनाही नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे सभापती पवार यांनी सांगितले.
पंचायत समितीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रीक पध्दत कार्यरत आहे. मात्र कर्मचारी कामावर येतान थंब इंप्रेशन देतात, जाताना मात्र त्याचा वापर केला जात नाही. त्याचाच गैरफायदा घेतला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.