शहरातील गुन्हेगारीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून, पोलिसांना मामा बनविण्याचे प्रकार जसे वाढले आहेत, तसेच पोलीस असल्याचे सांगून लुटले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यातील दोघे जण हे गृहरक्षक दलाचे जवान आहेत. या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहे.
बसमध्ये चढताना मंगळसूत्र ओरबाडणाऱ्या एका महिलेला प्रवाशांनी पकडले. तिच्या साथीदारांनीच मारहाण करीत पोलिसांच्या ताब्यात देण्याचा बहाणा करीत हातावर तुरी देऊन सर्व जण पसार झाले. येथील बसस्थानकावर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. बसमध्ये चढण्याच्या वेळी गर्दीत एका प्रवासी महिलेचे मंगळसूत्र ओरबाडताना तिच्या मागे असलेल्या प्रवाशांनी या महिलेला पकडले. काही स्थानिक प्रवाशांनी पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी दूरध्वनी केला. त्या वेळी तेथील तीन तरुणांनी मंगळसूत्र ओरबाडणाऱ्या त्या महिलेस मारहाण करण्यास सुरुवात केली. तुला पोलिसांच्या ताब्यात देतो, असे म्हणत मारहाण करीत तिला बसस्थानकाच्या बाहेर नेले.
सपकाळे यांनी पोलीस पथक बसस्थानकात पाठविले त्या वेळी चोरी करणाऱ्या महिलेस प्रवाशांनी मारहाण करीत पोलीस ठाण्याकडे नेल्याचे सांगण्यात आले. पोलिसांचे पथक तसेच माघारी फिरले, मात्र महिला व मारहाण करणारे पोलीस ठाण्यात पोहोचलेच नव्हते. त्या वेळी चोरटय़ांच्या टोळीने हातावर तुरी दिल्याचे पोलिसांच्या व उपस्थित प्रवाशांच्या लक्षात आले.
दुसरी घटना यापेक्षा रंजक आहे. सरबजित रघुनंदन सेठी (रा. गुरू नानकनगर, गोंधवणी रोड, श्रीरामपूर) यांचे संगमनेर रस्त्यावर दुचाकी विक्रीचे दुकान आहे. सोमवारी दुपारी एका इनोव्हा गाडीतून उतरलेला भरजरी कपडय़ातील एक तरुण सेठी यांच्याकडे गेला. करीज्मा दुचाकी घ्यावयाची असून दाखविण्याची विनंती केली. त्यानंतर मोटारसायकल पसंत पडली असून टेस्ट राईडची मागणी केली. संबंधित तरुणाने सोबतची दहा लाख रुपयांची इनोव्हा कार तुमच्याकडे राहूद्या असे म्हणत इनोव्हाची चावी सेठी यांच्याकडे दिली व मोटारसाकल घेऊन गेला. सुमारे चार तास उलटूनही तो न परतल्याने सेठी यांनी इनोव्हाच्या चालकास विचारपूस केली असता तो माझा मालक नव्हता तर त्याने ही भाडोत्री गाडी केलेली आहे. मी केवळ चालक असल्याचे त्याने सांगितले. चोरटय़ाने ही गाडी शिर्डी येथून भाडेतत्त्वावर घेतली होती. इनोव्हा ही शिर्डी येथील वाघ यांची असल्याचे चालक पठाण याने सांगितले.
लुटमारीची एक घटना टिळकनगर येथे घडली. येथील अधिकारी वसाहतीत मानसी जॉर्ज फुटी (वय ३९) यांना काल पोलीस असल्याचे सांगून मारहाण करून त्यांच्याजवळील ९ हजार रुपये किमतीचा मोबाइल व रोख रक्कम लुटली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन सचिन सुधाकर सरोदे, महेंद्र दिनकर सरोदे, सचिन भिकाजी त्रिभुवन या तिघांना अटक केली. विशेष म्हणजे पकडलेल्यांपैकी दोघे गृहरक्षक दलाचे जवान आहेत.