वाहनचालकांच्या किरकोळ वाटणाऱ्या चुकांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर होत असल्याचा साक्षात्कार आता वाहतूक विभागाला झाला असून यापुढे पुणेकरांना शिस्त लावण्याचा चंग वाहतूक विभागाने बांधला आहे. त्यामुळे सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर गाडय़ा उभ्या करणे, पदपथावरचे पार्किंग, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे अशा चुकाही पुणेकरांना सोमवारपासून महागात पडणार आहेत.
पुढील दीड महिना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस बारीक लक्ष ठेवणार आहेत. वाहतुकीचे अगदी किरकोळ समजले जाणारे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडे दुर्लक्ष न करता त्यांच्यावर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाणार आहे. पदपथावर वाहने उभी करणे, पदपथावरून गाडी चालवणे, बस थांब्यांच्या आजूबाजूला वाहने उभी करणे, रस्त्याच्या कोपऱ्यांवर वाहने उभी करणे, ट्रिपल सीट जाणे, सीटबेल्ट नसणे, सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंग न पाळणे, दारू पिऊन गाडी चालवणे, विरुद्ध दिशेने गाडी चालवणे, रिक्षा भाडे नाकारणे, अशांसारख्या तेरा नियमांचा या मोहिमेत समावेश करण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले, ‘‘वाहन चालकांना या चुका किरकोळ वाटतात. त्यामुळे बेदरकार वृत्ती वाढीस लागली आहे. याचा परिणाम वाहतुकीवर मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यामुळे ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम मोडण्याच्या वृत्तीला आळा घालण्यासाठी नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना शिस्त लागून त्याचा इतरांना फायदा होईल.’’
भाडे नाकारणारे रिक्षाचालकही निशाण्यावर
अनेक वेळा आवाहन करूनही रिक्षाचालक भाडे नाकारत असल्यामुळे त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. मात्र, त्यासाठी पोलिसांनी नामी शक्कल शोधून काढली आहे. साध्या वेशातील महिला पोलीस प्रवासी म्हणून रिक्षामधून प्रवास करणार आहेत. त्यांच्या मार्फत भाडे
नाकारणाऱ्या रिक्षाचालकांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. रिक्षाचालकाने भाडे नाकारल्यास त्याबाबत वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाच्या ०२०-२६१२२००० या क्रमांकावर संपर्क साधून रिक्षाचा क्रमांक कळवावा, असे आवाहन उपायुक्त विश्वास पांढरे यांनी केले आहे.