पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ती कायम प्रवाहित राहील याच्या नियोजनाचा आराखडा पाटबंधारे विभागाने तयार करावा, प्रदूषणामुळे काविळीसारखी रोगराई पुन्हा पसरणार नाही याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्या.
पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात जिल्हाधिकारी माने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हय़ातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना अधिकाऱ्यांकडून सुचविण्यात आल्या. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी वर्षांतून एकदा नदी स्वच्छ करावी लागते, हा प्रकार बरोबर नाही असा उल्लेख करून जिल्हाधिकारी माने म्हणाले, उन्हाळय़ामध्ये काविळीची साथ पसरल्याने अनेकांना जीव गमवावा लागला. इचलकरंजी परिसरात ही साथ मोठय़ा प्रमाणात उद्भवलेली होती. तेथील नागरिकांना चांगल्या प्रकारचे पाणी मिळण्यासाठी नगरपालिकेने ६२० कूपनलिकांचा वापर करण्याचे नियोजन करावे, इचलकरंजी शहराला वारणा नदीतून खोची येथून पाणीपुरवठा करण्याचा विचार आहे. कोल्हापुरातील राजाराम बंधारा ते शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधारा या भागात पाणी वाहते राहण्यासाठी पाटबंधारे खात्याने दक्षता घ्यावी, नदीचे प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज, इचलकरंजीचे मुख्याधिकारी देवेंद्र सिंग, नितीन देसाई, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता खलील अन्सारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी डोके, महापालिकेचे उपायुक्त संजय हेरवाडे आदी उपस्थित होते.