महाविद्यालयात दलालांच्या टोळ्या सक्रिय
अकरावी प्रवेश अर्ज स्वीकृतीच्या महाविद्यालयांमध्ये हजारोंच्या संख्येने अर्ज दाखल झाल्यामुळे निर्माण झालेली प्रचंड स्पर्धा लक्षात घेऊन काही पालक आणि विद्यार्थ्यांनी शिक्षम विभागातील अधिकाऱ्यासंह प्रशासकीय अधिकारी आणि काही राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून ठराविक महाविद्यालयात ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरूवात केली आहे. परिणामी, प्रवेश अर्जासोबत स्थानिक लोकप्रतिनिधींची शिफारसपत्रे, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे अचानक वाढलेले दूरध्वनी, विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात मारलेला ठिय्या.. अशा विविध घटनाक्रमांनी महाविद्यालय व्यवस्थापनच नव्हे, तर शिक्षण विभाग हैराण झाल्याचे चित्र आहे. सगळ्याची नजर व्यवस्थापन कोटय़ाकडे असली तरी रितसर अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिक्षा आहे, ती आता अठरा जुलैला जाहीर होणाऱ्या पहिल्या विज्ञान अभ्यासक्रम यादीची!
केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून रविवारी द्विलक्षी अभ्यासक्रमाची यादी जाहीर झाली आहे. या यादीत राज्य शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांच्या हाती निराशाच लागली असून अनेक विद्यार्थ्यांना ८५ ते ९० टक्के गुण असताना यादीत नाव आले नाही. ७५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या ४ हजार ६८३ जागा असताना ५ हजार ५४० विद्यार्थ्यांमध्ये चुरस होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असताना द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या यादीमध्ये नाव आले नाही. विज्ञानसाठी साडेसात हजार जागांसाठी २० हजार ६७ अर्जाची विक्री करण्यात आली आहे. त्यापैकी १४ हजार ९८० अर्ज स्वीकारण्यात आले आहे. त्यात उर्दु विज्ञान शाखेत ३५१, तर गृहविज्ञानाच्या २३ अर्जाचा समावेश आहे. जरनल सायन्ससाठी १४ हजार ६०६ अर्जाची नोंदणी झाली असून ही संख्या उपलब्ध जागांपेक्षा दुप्पट आहे. विज्ञानची अंतिम यादी १८ जुलैला जाहीर होणार आहे.
 सध्या शहरातील विविध महाविद्यालयांचा परिसर विद्यार्थी व पालकांची गर्दी दिसून येत आहे. द्विलक्षी अभ्यासक्रमाची अंतिम यादी जाहीर करण्यात आली असली तरी काही विद्यार्थ्यांची या ना त्या मार्गाने संबंधीत महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे. शहरातील शिवाजी विज्ञान महाविद्यालय, डॉ. आंबेडकर महाविद्यालय, धरमपेठ विज्ञान महाविद्यालय, हिस्लॉप महाविद्यालय, जी एस कॉमर्स, धरमपेठ कॉमर्स महाविद्यालय, कमला नेहरू महाविद्यालय प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ आहे. गुणवत्तेनुसार प्राधान्य क्रमाच्या यादीत स्थान मिळेल की नाही याबद्दल साशंकता असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या महाविद्यालयात अर्ज भरण्यास प्राधान्य दिले आहे. तथापि, याप्रकारे जादा अर्ज भरल्याने पहिल्या ‘कट ऑफ लिस्ट’ मध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या प्रवेश अर्जाची छाननी करून प्रत्येक महाविद्यालयात संवर्गनिहाय विद्यार्थ्यांच्या याद्या लावण्यात येणार आहेत.
बेस्ट ऑफ फाईव्हच्या निकषामुळे गुणांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाल्याने प्रवेश प्रक्रियेत काहीसे पिछाडीवर पडण्याची साशंकता असलेल्यांनी वेगवेगळे पर्याय शोधून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेच्या निकषावर होणार असल्याचे शिक्षण विभागाने वारंवार स्पष्ट केले आहे. तरी देखील काही पालक व विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा व्यवस्थापन कोटय़ाकडे वळविला आहे. या कोटय़ातील जागा मिळावी यासाठी स्थानिक नगरसेवकांपासून ते अगदी आमदार, खासदारांपर्यंतची शिफारस पत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धडपड सुरू आहे. काही खास महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी दलालाची टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाली असून जादा पैसा घेऊन ती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या किंवा संबंधित महाविद्यालयातील व्यवस्थानाच्या माध्यमातून प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे.