गणेश विसर्जनानिमित्त तलावाकडे जाणाऱ्या मार्गावर गर्दी होऊन वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने मार्ग ठरवून दिले आहेत. सर्वाधिक गणेशमूर्तीचे विसर्जन फुटाळा तलावात होणार असल्यामुळे या ठिकाणी कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. विसर्जन किंवा मिरवणुकी दरम्यान जे युवक हुडदंग घालतील त्यांच्या विरोधात ‘दबंग’ (थेट पोलीस कोठडी) कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले.
गांधीसागर तलावाजवळील गणेश मंदिरात भाविकांची गर्दी होत असल्याने कॉटन मार्केटकडून येणाऱ्या मूर्ती रमण विज्ञान केंद्रासमोर, संत्रा मार्केटकडून येणाऱ्या मूर्ती टाटा पारशी शाळेसमोर विसर्जित कराव्या लागतील. पूर्व नागपुरातून फुटाळा तलावाकडे जाणाऱ्या मिरवणुकी गांधीसागर, लोखंडी पूल, मानस चौक, झिरो माईल, आरबीआय चौक, लिबर्टी चौक, व्हीसीए, सदर पोलीस ठाणे, वेकोलि कार्यालय, तेलंगखेडी मार्गाने जातील. सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरून येणारे जयस्तंभ, एलआयसी मार्गाने लिबर्टी चौक, व्हीसीए, सदर पोलीस ठाणे, वेकोलि कार्यालय, तेलंगखेडी मार्गाने जातील. मात्र, पोद्दारेश्वर राम मंदिरासमोर उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू असून परिस्थितीनुसार मार्गात बदल होऊ शकतो. या मार्गाने तेलंगखेडीपर्यंत टी पॉइंटवर मूर्ती वाहनातून उतरवून विसर्जनासाठी नेता येईल. मोठी वाहने वायुसेनानगर, दूरदर्शन केंद्र, सेमिनरी हिल्स मार्गे परत जातील.
वेकोलि, आयकर कार्यालय, हनुमान मंदिर, रविनगर, एलआयटी या ठिकाणी लोखंडी कठडे राहतील. फुटाळा तलावावर गर्दी होत आहे, असे दिसल्यास या कठडय़ांजवळ मिरवणुका थांबवल्या जातील आणि नंतर त्यांना सावकाश पुढे जाऊ दिले जाईल. विसर्जनस्थळी गर्दी होऊन चेंगराचेंगरीसारख्या घटना होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाणार आहे. व्हरायटी चौक, लॉ कॉलेज चौक, रविनगर तसेच, वाडीकडून येणाऱ्या मिरवणुकी कल्याणेश्वर मंदिरापर्यंत येतील. तेथे मूर्ती वाहनातून उतरवल्यानंतर वाहन जुन्या नाकामार्गे परत जाईल. वाडीकडून येणारी वाहतूक एमआयडीसी अथवा मारुती शोरूमसमोरून वायुसेना नगरकडे जाईल. इतवारीकडून येणाऱ्या घरगुती मूर्ती अग्रसेन चौक, चिटणीस पार्क, गांधी गेट, टिळक पुतळामार्गे गांधीसागरावर जातील. वाहने टाटा पारशी शाळा, जुना जेलखानामार्गे जातील. जुनी शुक्रवारी व सक्करदराकडून येणारी वाहने गणेशपेठ पोलीस ठाण्यासमोरून येतील आणि मॉडेल मिलकडे जातील. टिळक पुतळा ते गांधीगेट तसेच, गांधीगेट ते चिटणीस पार्क तसेच, चिटणीस पार्क ते नातिक चौक या मार्गावर वाहतुकीस मनाई राहील.
चिटणीस पार्क ते नातिक चौक या मार्गावर पार्किंग राहील. आग्याराम देवी चौक ते एम्प्रेस मिल, टाटा पारशी शाळा तसेच, टाटा पारशी शाळा ते नातिक चौक या मार्गावरही वाहतुकीस मनाई राहील. सोनेगाव तलावाकडे जाणारी वाहने सावरकरनगर चौक, खामला चौक, सहकारनगर मार्गे जातील. विसर्जन झाल्यानंतर वळसा घेऊन परत भेंडे लेआऊट, जयताळा मार्गाने परत जातील. वर्धा मार्गाने येणारी वाहने राजीवनगरमार्गे येतील. विसर्जन झाल्यानंतर वळसा घेऊन परत भेंडे लेआऊट, जयताळा मार्गाने परत जातील.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
गणपती विसर्जना दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून शहरातील विविध तलावाच्या ठिकाणासह मिरवणुकीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. विसर्जनादरम्यान सुरक्षेसाठी शहरात ५ हजार पोलीस कर्मचाऱ्यांशिवाय ६५० होमगार्ड आणि राज्य राखीव दलाच्या दोन तुकडमधील जवान तैनात करण्यात येणार आहे. संवेदशनशील ठिकाणी रात्रीपासूनच पोलीस तैनात केले जाणार आहे. फुटाळा, गांधीनगर, कोराडी, संजय गांधी नगर आणि सोनेगाव तलावावर सात वॉच टॉवर उभारण्यात येणार आहे. मोठय़ा गणपतीच्या मिरवणुकी दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मिरवणुकीसोबत  पोलीस राहणार आहेत. फुटाळा तलावाजवळ वाहतूक सुरळीत राहावी यासाठी तलाव परिसरात शंभर वाहतूक पोलीस तैनात केले जातील. फुटाळा तलावाजवळील मत्स्य विज्ञान विद्यापीठासमोर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंगस्थळी पोलीस बंदोबस्त राहणार आहेत. शिवाय सोनेगाव तलावाजवळ वाहनांची होणारी गर्दी बघता सहकार परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.