23 November 2017

News Flash

मनमाडमध्ये १५ टँकरव्दारे पाणी पुरवठय़ास मंजुरी

शहरासाठी १५ टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यास विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली असून शुक्रवापर्यंत विविध भागात

मनमाड | Updated: February 13, 2013 2:06 AM

शहरासाठी १५ टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यास विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली असून शुक्रवापर्यंत विविध भागात टँकरव्दारे पाणी पुरविणे सुरू होणार आहे. सध्या वाघदर्डी धरणाजवळील खासगी अधिग्रहीत विहीरीतून टँकरव्दारे पाणी घेण्याचा प्रस्ताव आहे. त्यानंतर माणिकपुंज धरणातील पाणी टँकरने पुरविले जाईल, अशी माहिती पालिकेचे मुख्य अधिकारी संजय केदार यांनी दिली. शहरातील अनेक भागांमध्ये २२ दिवसानंतरही नळाव्दारे पाणी पुरवठा न झाल्याच्या पाश्र्वभूमीवर पालिकेने स्वत:च्या पाच-सहा टँकरव्दारे रविवारपासूनच पाणी पुरविणे सुरू केले आहे. दरम्यान गुरूवारी पाणी प्रश्नावर शहर पत्रकार संघाने ‘मनमाड बंद’ पुकारला आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणाने तळ गाठल्याने मनमाडकरांसमोरील टंचाईचे संकट अधिकच गहिरे झाले आहे.  पालखेड धरणातून १० मार्चच्या दरम्यान पाणी मिळणार असल्याने तोपर्यंत म्हणजे सव्वा महिना तहान कशी भागवायची असा प्रशासनासमोर प्रश्न आहे. निर्माण झालेली गंभीर परिस्थिती पाहता पालखेडमधून तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. जूनपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले असल्याने मनमाडकरांनी भीती बाळगू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे अलिकडेच करण्यात आले होते. परंतु हे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे दिसत आहे. शहराच्या मध्य भागातील शिवाजी चौकातील पाण्याच्या टाकीवर आणि ज्या ठिकाणी कुपनलिकांना पाणी आहे, तिथे पाण्यासाठी लांबच लांब रांगा लागत आहेत.
शहरात आता नळांव्दारे कधी पाणी येईल हे सांगता येणे मुश्किल आहे. पावसाळा येईपर्यंत मनमाडकरांची तहान कशी भागवाल, याची माहिती देण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढे येत नसल्याने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होऊ पाहात आहे. सेना, भाजप, रिपाइंने आंदोलनांव्दारे मनमाडकरांच्या संतापाला वाट मोकळी करून देण्याचे काम केले असले तरी पालिकेतील सत्ताधाऱ्यांतर्फे केवळ आश्वासने देण्यात येत आहेत.

First Published on February 13, 2013 2:06 am

Web Title: permission for water supply in manmad by 15 tankers
टॅग Manmad,Water Supply