शहरातील तवली फाटय़ावरील जयआनंद निराश्रित बालगृहातील मुलींचा मानसिक छळ आणि वाय. डी. बिटको शाळेतील शिक्षकाच्या गैरवर्तनप्रकरणी कठोर कारवाईची मागणी आ. जयंत जाधव यांनी केली आहे.
विधान परिषदेत विशेष उल्लेखाद्वारे उपस्थित केलेल्या चर्चेत आ. जाधव यांनी नाशिक येथील निराश्रित बालगृहात अनेक वर्षांपासून सहा ते १४ वयोगटातील ३४ मुलींचे पाच कर्मचाऱ्यांकडून मानसिक शोषण व मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार मुलींनी महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांकडे केल्याची माहिती दिली. २५ मार्च रोजी या गैरप्रकारास वाचा फुटली. मुलींनी पाच जणांविरुद्ध तक्रार केली असली तरी केवळ चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच न्यू एज्युकेशन इन्स्टिटय़ूट संचालित वाय. डी. बिटको शाळेतील एक शिक्षक विद्यार्थिनींशी गैरवर्तन करीत असल्याबद्दल २२ मार्च रोजी पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली, मात्र या प्रकाराबाबत माध्यमिक शिक्षण विभागाकडून अनभिज्ञ असल्याचे दाखवून कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.
या दोन्ही घटनांमधील दोषींविरुद्ध तातडीने कारवाई केली जात नसल्याने जिल्ह्यात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत पालकांच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. त्यामुळे या दोन्ही गंभीर प्रकरणांची तातडीने सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी आ. जाधव यांनी विशेष उल्लेखाद्वारे केली आहे.