डिझेल तसेच सुटे भाग यांच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे तोटा वाढत असल्याचे कारण दाखवून अखेर पीएमपीने दरवाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. या निर्णयानुसार दुसऱ्या टप्प्यापासून तिकिटाच्या दरात एक रुपया वाढ होणार आहे. विशेष म्हणजे, संचालक मंडळात पुणे आणि पिंपरीकरांचे प्रतिनिधी म्हणून गेलेल्या पदाधिकाऱ्यांनीही या दरवाढीच्या विरोधात मौन बाळगून दरवाढीला पाठिंबा दिला.
पीएमपीचा वाढता तोटा भरून काढण्यासाठी तिकिटांच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव पीएमपी प्रशासनाने संचालक मंडळासमोर गेल्या महिन्यात ठेवला होता. या दरवाढीला संचालक मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी एकमताने मंजुरी देण्यात आली. संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्याचे तिकीट सध्या पाच रुपये आहे. त्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मात्र, दुसऱ्या स्टेजपासूनच्या दरात सरसकट एक रुपया वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पहिला टप्पा सोडून सरासरी वाढ एक रुपया इतकी असेल. दरवाढीचा हा प्रस्ताव आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरणासमोर ठेवला जाईल. प्राधिकरणाने त्याला संमती दिल्यानंतर दरवाढ प्रत्यक्षात लागू होईल. या प्रक्रियेला तीन आठवडे लागतील, असे सांगण्यात आले.
पीएमपीने दरवाढीचा प्रस्ताव ठेवल्यानंतर तो थांबवण्यात आला होता. पुणे व पिंपरी महापालिकांनी पीएमपीला जकात माफी द्यावी म्हणजे काही प्रमाणात तूट भरून निघेल असा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, महापालिकेने जकातमाफी द्यायला नकार दिल्यामुळे दरवाढीला मंजुरी देण्यात आली, असा दावा करण्यात आला आहे. विविध कारणांमुळे पीएमपीला सध्या वार्षिक तोटा २७ ते ३० कोटी रुपये इतका येत असून दरवाढीमुळे २३ कोटी रुपयांचे वाढीव उत्पन्न मिळेल, असाही दावा करण्यात आला आहे.
पीएमपीचा तोटा सातत्याने वाढत असून ही परिस्थिती कायम राहिली तर पुढच्या महिन्यातच पीएमपी बंद करावी लागेल, असे पीएमपीचे संचालक, नगरसेवक प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. डिझेलसाठी पीएमपीला सध्या वर्षांला १०० कोटी रुपयांचा खर्च येत असून त्यातील २६ कोटी रुपये व्हॅट द्यावा लागतो. राज्य शासनाने तो माफ केल्यास तोटा कमी होण्यास मदत होईल, असेही जगताप म्हणाले. सुटे भाग खरेदीसाठी पुरेसा निधी नसल्यामुळे पीएमपीच्या २५० गाडय़ा रोज मार्गावर जाऊ शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दरवाढीला संघटनांचा विरोध
पीएमपीच्या दरवाढीला पीएमपी प्रवासी मंच या संघटनेसह अन्य दहा स्वयंसेवी संघटनांनी तीव्र विरोध केला असून ही दरवाढ अन्यायकारक आणि असमर्थनीय असल्याची प्रतिक्रिया प्रवासी मंचचे अध्यक्ष जुगल राठी यांनी व्यक्त केली. तोटा कमी करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करायच्या नाहीत, भ्रष्ट कारभार सुधारायचा नाही आणि कारभारात कार्यक्षमताही आणायची नाही असा प्रकार सातत्याने सुरू आहे. कारभारात सुधारणा न करता फक्त तिकीट दर वाढवण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे, त्याला सर्व संघटना सर्व मार्गानी विरोध करतील, असेही राठी यांनी सांगितले.