रस्त्यावरील कचरा उचलण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीप्रकरणी समीक्षा कन्स्ट्रक्शन कंपनीचे पर्यवेक्षक रवींद्र वडावराव (वय ५९) यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांनी अंतरिम जामीन मंजूर केला, तर काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्यासह त्यांचे पती जॉन फुलारे आदी चौघाजणांना मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. जाधव यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महापालिकेने शहरातील कचरा उचलण्याच्या कामाचे खासगीकरण केले असून हे काम समीक्षा कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. कंपनीत रवींद्र वडावराव हे पर्यवेक्षकपदावर कार्यरत आहेत. काल गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास कंपनीतील कामगार किशोर गीते यास नगरसेविका श्रीदेवी फुलारे व त्यांचे पती जॉन फुलारे यांनी मारहाण केल्याचे त्यांना समजले. गीते हा जुन्या एम्प्लॉयमेंट चौकात थांबला असता घडल्या प्रकाराबाबत वडावराव हे विचारणा करीत होते. त्या वेळी नगरसेविका श्रीदेवी फुलारे व त्यांचे पती जॉन फुलारे यांनी दोघे बुलेट मोटारसायकलवरून येऊन गीते यास शिवीगाळ करून त्याच्या अंगावर बुलेट घालून मारहाण केली. तसेच वडावराव यांनाही मारहाण करून त्यांच्या खिशातील १३०० रुपयांची रोकड, सोन्याची अंगठी व मोबाइल संच बळजबरीने काढून घेतला. अशा आशयाची फिर्याद वडावराव यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात नोंदविली होती. या प्रकरणी पोलिसांनी नगरसेविका श्रीदेवी फुलारे व त्यांचे ‘बलदंड’ पतिराज जॉन फुलारे यांच्यासह जीवन विलास शिंदे व सदानंद ऊर्फ पिंटू विलास शिंदे यांना अटक केली होती. दरम्यान, किशोर गीते यास मारहाण केल्याच्या कारणावरून रवींद्र वडावराव तसेच अन्य दोन अज्ञात व्यक्तींनी नगरसेविका फुलारे व त्यांचे पती जॉन फुलारे यांना हाताने मारहाण करून पाचशेची रक्कम व गळय़ातील सोनसाखळी काढून घेतल्याची फिर्याद दाखल झाल्यावरून किशोर गीते यास अटक झाली होती. तर रवींद्र वडावराव यांनी आपणास अटक होऊ नये म्हणून जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला होता. वडावराव यांच्या वतीने बाजू मांडताना अॅड. मिलिंद थोबडे यांनी, वडावराव हे महापालिकेचे निवृत्त अधिकारी असून आजपर्यंतच्या काळात त्यांच्या सेवेत कोणताही डाग लागला नाही. तसेच ते पोलिसांना तपासकामात सहकार्य करतील, असे मुद्दे मांडले. ते ग्राहय़ धरून न्यायालयाने वडावराव यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. फुलारे यांच्या वतीने अॅड. अब्बास काझी व अॅड. अहमद काझी यांनी काम पाहिले. अॅड. थोबडे यांना अॅड. विनोद सूर्यवंशी, अॅड. राजकुमार मात्रे, अॅड. दत्ता गुंड, अॅड. रेवण पाटील यांनी साहाय्य केले. मुख्य न्यायदंडाधिकारी जाधव यांनी नगरसेविका श्रीदेवी फुलारे व त्यांचे पती जॉन फुलारे यांच्यासह चौघाजणांना पोलीस कोठडी सुनावली. यात सरकारतर्फे अॅड. दुलंगे यांनी काम पाहिले.